नव्या वादाला तोंड फुटले
लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाईकाचा फोन मतमोजणीच्या दिवशी ‘ईव्हीएम’शी जोडलेला होता, असा दावा करणारे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. रवींद वायकर यांचा या मतदारसंघात ४८ मतांनी विजय झाला होता.
ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ‘ईव्हीएम’वर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, त्यांच्या पोस्टचा उल्लेख करीत राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी उत्तर-पश्चिम मुंबईतील मतदानयंत्राचा मुद्दा उपस्थित केला. भारतातील ‘ईव्हीएम’ हा एक ‘ब्लॅक बॉक्स’ असून, त्याची छाननी करण्याची कोणालाही परवानगी नाही, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही, ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असू भविष्यातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली.
सीसीटीव्ही फुटेजची मागणी
‘संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असेल तर लोकशाही फसवी आणि फसवणुकीला बळी पडते,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर ‘ईव्हीएम’विरोधी सूर लावला. शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही हे वृत्त प्रसारित करून मतमोजणीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी केली.
भाजपने मात्र विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ‘ईव्हीएम’बाबत खोटी बातमी प्रसारित करून खोटे रेटून बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने खटला चालवायला हवा, अशी मागणी भाजपने केली.
मतदानयंत्र ‘अनलॉक’ करण्यासाठी मोबाइलवर ‘ओटीपी’ येत नाही. कारण या यंत्रात वायरलेस संदेशवहनाची क्षमता नाही. मतदानयंत्राचे कोणत्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून, त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. यामुळे संबंधित वृत्तपत्राला बदनामीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
-वंदना सूर्यंवशी, निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ
मस्क काय म्हणाले?
‘मानवी किंवा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’द्वारे (एआय) ‘ईव्हीएम’मध्ये हॅकिंगचा धोका असतो. हा धोका अतिशय कमी असला, तरीही या मशिनचा वापर बंद करायला हवा’, असे ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क म्हटले आहे. त्यांनी ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, भारतामध्ये वादाला सुरुवात झाली.
चंद्रशेखर म्हणाले…
माजी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एलन मस्क यांचा दावा फेटाळला. ‘मस्क यांचे म्हणणे अमेरिका किंवा अन्य देशांतील मशिनसाठी लागू होऊ शकते, पण भारतातील ‘ईव्हीएम’ अन्य कोणत्याही नेटवर्कला जोडलेले नसतात. त्यामुळे ते सुरक्षित आहेत’, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.