माणिकराव कोकाटे प्रकरणाकडे सर्वांचे लक्षImage Credit source: टीव्ही ९ मराठी
राज्याच्या अर्थंसंकल्पीय अधिवेशनाचा श्रीगणेशाच महायुतीमधील बड्या नेत्याच्या राजीनाम्याने झाला. धनंजय मुंडे यांची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विकेट पडली. त्यातच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी सुद्धा वाढताना दिसत आहेत. 30 वर्षांपूर्वीच्या एका कोर्ट केस प्रकरणात त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. आज कोर्टाच्या निर्णयावर त्यांच्या मंत्रिपदच नाही तर आमदारकीचे भवितव्य ठरणार आहे.
आज नाशिक कोर्टात सुनावणी
कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा आज फैसला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार कोकाटे यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरेल. माणिकराव कोकाटे यांच्यावर शासकीय कोट्यातील घरे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे. सकाळी 11.30 दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होईल.
माणिकराव कोकाटे प्रकरणाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे
१. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी ‘१० टक्के योजना’ अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांसाठी बनावट कागदपत्रे सादर केली, असा आरोप करण्यात आला. १९९५ मध्ये हा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन अपक्ष आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
२. २९ वर्षांनंतर नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला २० फेब्रुवारी २०२५ रोजी दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ₹५०,००० दंड ठोठावण्यात आला.
३. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंच्या शिक्षेला २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली आणि प्रत्येकी ₹१ लाखाच्या जामीनावर त्यांची सुटका केली.
४. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्र न्यायालयात कोकाटे यांनी आपल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने हा निर्णय १ मार्चपर्यंत राखून ठेवला.
५. १ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने स्पष्ट केले की, मुळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल.त्या सोबतच या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आला..
६. पुढील सुनावणीची तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली होती . तर आज ५ मार्च २०२५ रोजी कोकाटे यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळते का, याचा निर्णय होणार आहे. जर शिक्षेवर स्थगिती मिळाली नाही, तर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेमुळे त्यांचे आमदारकीचे पद गमावण्याची शक्यता आहे.
काय होईल राजकीय परिणाम
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. तर कालपासून विधानभवन परिसर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दणाणून सोडला होता. त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आज विरोधक न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा आक्रमक दिसू शकतो