शरद पवार यांना मी कालही दैवत मानत होतो, आणि आजही दैवत मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आता यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
परिस्थितीनुसार सगळे बदलतात, तो दिवस दूर नाही, तीन वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज यायला सुरुवात झाली आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्षांना करावी लागणार आहे, नाही तर अस्तित्व शून्य अशी अवस्था होईल. त्यांनी दैवत म्हणून उल्लेख केला, काकांची पुण्याई त्यांच्या मागे आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली आहे, यावरून देखील वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रमध्ये धावणाऱ्या लालपरीच्या 70 ते 80 टक्के गाड्या नॉन एसी आहेत, त्या बसमध्ये नीट बसता सुद्धा येत नाही. चालक, वाहक चटके सहन करत आहेत, या गाड्या जुन्या झाल्यान अधिक तापतात. त्यातच आता एसटी कर्माचाऱ्यांच्या पगारात केलेली कपात म्हणजे त्यांच्या जखमेवर चोळलेलं हे मीठ आहे. वाहकांना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दहशतवादी आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे. यावर देखील वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद आहे, आज जर दहशतवादी राणाला भारतात आणलं असेल तर दाऊदला का आणलं नाही. या बॉम्बस्फोटामागे कोण होतं? हे सर्वांना माहीत आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणाव. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. या गोष्टीसाठी 15 वर्षे लागले. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.