भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून चर्चा सुरू असतानाच धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धस आणि मुंडे यांच्या भेटीने मनात चलबिचल नाही. गाव आहे, लोकप्रतिनिधी आहेत, या लढ्याला त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आहे. या प्रकरणात कुणीही दगाफटका करू नये, एकही आरोपी सुटता कामा नये ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. एखादा आरोपी सुटणार आहे, असं जेव्हा आम्हाला वाटले. त्यावेळी मी आणि माझे कुटुंब टोकाचं पाऊल उचलणार आहे, असा गंभीर आणि निर्वाणीचा इशाराच धनंजय देशमुख यांनी दिला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचा गेम झाला की धस यांचा गेम केला गेलाय? असा सवाल धनंजय देशमुख यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये काय आहे ते सिद्ध होईल. आमचा एकच प्रश्न आहे आम्हाला न्याय पाहिजे. आमची न्यायाची भूमिका आहे. आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही दुसऱ्या चर्चा करत बसलो तर हा विषय दुसरीकडे जाईल, असं धनंजय देशमुख म्हणाले.
एक वाक्यही चुकीचं नाही
आम्हा देशमुख कुटुंबीयांना न्याय हवा आहे. त्यासाठी सर्व घटकांची आम्हाला खूप गरज आहे. मनोजदादा आले नसते तर हा खून आठ ते दहा दिवसात त्यांनी पचवला असता, असंही ते म्हणाले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी धस यांच्यावर टीका केली. त्यावरही धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं. यात दादाची (मनोज जरांगे) भावना मोठी आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यात काहीही चूक नाही. समाजात अशी दुसरी घटना होऊ नये म्हणून ते बोलतात. यात त्यांचं एकही वाक्यही चुकीच नाही, असं देशमुख यांनी सांगितलं.
त्याची मोठी गँग असेल
कृष्णा आंधळेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ज्या दिशेने तपास सुरू आहे, तो योग्य दिशेने सुरू आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही आमची मागणी आहे. कृष्णा आंधळे फरार असल्यामुळे याच्यात जर कुठे कच्चा दुवा तयार झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार? कृष्णा आंधळेनी किती पुरावे नष्ट केलेत? त्याने काय काय प्रकरण केले? त्याची अगोदरची सगळी पार्श्वभूमी काय होती? या सगळ्या प्रश्नावर यंत्रणेला घेराव घातल्याशिवाय लोक राहणार नाहीत. कृष्णा आंधळे फरार असताना पोलीस यंत्रणे सोबत त्याची हात मिळवणी होती. तो पोलिसांच्या हाती लागला तर महत्त्वाचे पुरावे हाती येणार आहेत. प्रत्येक आरोपी सराईत आहे. कृष्णा आंधळे गंभीर गुन्हेगार असूनही त्याचे मित्र व्हाट्सअपला, इन्स्टॉल स्टेटस ठेवत आहेत. दहशत निर्माण करण्याची डेअरिंग करतात. त्याची पण मोठी गँग असणार आहे पाठीमागे, असा दावाही त्यांनी केला.
ज्याने पोसलं, त्याचंच अभय
कृष्णा आंधळे कुणाच्या संपर्कात आहे असं वाटतं का? असा सवाल धनंजय यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो संपर्कात आहे की नाही ते माहीत नाही, मात्र कृष्णा आंधळेला ज्याने कोणी पोसल होतं, त्यांचं मात्र त्याला अभय आहे. पाठीराख्यांनी कृष्णा आंधळेला अभय दिल असावं. ह्या घटना एकदम बरोबर आहेत, तुम्ही त्या करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं पाठबळ कुणी तरी दिलं असेल, असंही ते म्हणाले.