Crime News : चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांकडून 15.12 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
अमोल महेश माने (वय ३०, रा. शिवपार्वती कॉलनी, हरीपुर), कार चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय २९, रा. हरीपुर रोड, झाडातच्या मारुतीच्या मागे, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनचंद्र सकळे (वय 87, रा. पत्रकार नगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सकळे यांच्या घरी लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मवीर पतसंस्थेतून दागिने काढले होते. शुक्रवारी सकाळी ते दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी चालक नितेश गजगेश्वर याला घेऊन गेले होते. ते कारमधून उतरल्यावर दुचाकीवरून आलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील दागिन्यांची बॅग लंपास केली होती.
या घटनेनंतर खळबळ उडाली होती. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक भालेराव यांनी तातडीने पथकांना सूचना देऊन चोरट्याला पकडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान पथकातील विशाल भिसे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर यांना ही चोरी हरिपूर येथील अमोल माने याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने सकळे यांचा कार चालक नितेश गजगेश्वर याने दागिने ठेवण्यासाठी पतसंस्थेत जाणार असल्याची टीप दिली होती. तसेच कर्मवीर चौकात आधीच जाऊन थांब आणि सकळे गाडीतून उतरल्यावर बॅग लंपास कर असे सांगितल्याची कबुली दिली. तसेच ते दागिने असलेली बॅग माने याच्या छोटा हत्ती गाडीत ठेवल्याचे सांगितले त्यानंतर चालक गजगेश्वर याला अटक करण्यात आली.
या दोघांकडून दागिने, दुचाकी (एमएच-१० एएस-४९३५), छोटा हत्ती (एमएच-11 एजी ७१४९) असा 15.12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कविता नाईक, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, विशाल भिसे, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, गणेश बामणे, उमेश कोळेकर, करण परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.