शरद पवार पक्षाचा बडा नेता अजितदादांना भेटल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोठ स्टेटमेंट, ‘काही गोष्टी न बोललेल्या…’

शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याने आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते शशिकांत शिंदे आज अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी शरद पवार पक्षाच्या तुतारी निवडणूक चिन्हावर लढवली होती. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांनी तर विधानसभेला महेश शिंदे यांनी पराभूत केलं. शशिकांत शिंदे भेटून गेल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात. शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. आज सत्तेच्या बाहेर अनेक लोक अस्वस्थ आहेत. त्यामध्ये शशिकांत शिंदे आहेत. त्यामुळे ते गेले असतील. काल, या सत्तेत जीव रमत नाही असं ते विरोधी बाकांवर असताना बोलले. म्हणून ते आज कदाचित दादांना भेटायला आले असतील, ते जर सांगत असतील की, याचा कोणी अन्वयार्थ काढू नये, ही सदिच्छा भेट होती, तरी शशिकांत शिंदेंसारखा नेता उगाच सदिच्छा भेट घेणार नाही” असं अमोल मिटकरी म्हणाले.

‘असा उद्दामपणा खपवून घेणार नाही’

“छगन भुजबळ साहेबांची नाराजी स्वत: दादा दूर करतील, असं मला कळलय. ते वरिष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ यांनी विधान कशा अर्थाने केलय, आज त्यांच्या समर्थकांचा मेळावा आहे, त्यात ते खुलासा करतील” असं अमोल मिटकरी म्हणाले. शरद पवार गटाच्या राजापूरकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली, त्यावर अमोल मिटकरी म्हणाले की, “छगन भुजबळ अनेक वर्षांपासून ओबीसीच नेतृत्व करत आहेत. आम्ही ओबीसी आहोत. कोणीही त्यांना भेटू शकतं, पण कार्यकर्त्यांच्या आडून कोणी उतावीळ कार्यकर्ते जोडेमारो आंदोलन करत असतील तर ते खपवून घेणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल. असा उद्दामपणा खपवून घेणार नाही. अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत”

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)