हे दोन्ही नेते मला… अजितदादांनंतर आता छगन भुजबळ, शरद पवारांविषयी नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना खासदार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्याविषयी भाष्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) कालही माझे दैवत होते, आजही आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. याच विधानानंतर आता आमदार छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आदरस्थानी आहेत, असं त्यांनी म्हटलंय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे दोन्ही नेते मला आदरस्थानी- छगन भुजबळ

“माझं भाग्य आहे की, 25 ते 27 वर्षे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळालं. म्हटलं तर मी त्यांचा उजवा हात होतो. मला त्यांच्या जवळ राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत. या दोघांपासूनही आम्ही शिकलो. हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे एका सभेत भाषण केले होते. या भाषणात त्यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य केले. मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो. आजही दैवत मानतो. मन तळ्यात-मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असं अजित पवार म्हणाले होते. ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.

नगरपालिका, जिल्हा परिषदेचं आरक्षण अडकून

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीआधारित जनगणनेची मागणी केली आहे. यावर बोलताना आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या, अशी मागणी करत आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच “आताही आमचं नगरपालिका, जिल्हा परिषदेचं आरक्षण अडकून आहे. आम्ही आमची जनगणना करा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला आमचं पूर्ण आरक्षण द्या किंवा आमचे माणसं मोजा,” अशी मागणी भुजबळ यांनी केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)