पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले, तोपर्यंत तीला दाखल देखील करून घेतले नाही. उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. तनिषा भीसे असं या मृत महिलेचं नाव आहे. तनिषा भीसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरोदरा हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
एक महत्त्वाच्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे. खरं पाहिलं तर काही विषयांवर आम्ही राजकारण टाळत असतो. जनहिताची आंदोलन घेत असतो. आज पुण्यामध्ये भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी एका खासगी क्लिनकमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. हे प्रकरण संबंधित आहे, ते म्हणजे अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी . मी दोन दिवसांपासून या घटनेवर काहीच बोललो नाही, कारण या घटनेवर बोलणं मला योग्य वाटत नव्हतं, कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या घटनेवर आपण बोलतो, तेव्हा त्या घटनेला राजकीय दृष्टीकोणातून पाहिलं जातं. मात्र काल आम्ही शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं, कारण यावर सरकार पूर्ण पणे गप्प असल्याचं आम्हाला दिसून आलं. आज भाजपचेच कार्यकर्ते असुरक्षीत आहेत, त्यांनाच न्याय मिळत नाहीये, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, हॉस्पिटल प्रशासनाला एवढी मग्रुरी आणि मस्ती कशाची आली आहे? ते देखील कळणं गरजेचं आहे. या रुग्णालयामध्ये जे काही दोष असतील ते दोष सुधारण्यासाठी सरकार पुढे येईल का? किंवा सरकार हे हॉस्पिटल स्वत:कडे चालवण्यासाठी घेणार का? हे पण कळालं पाहिजे, आणि जे हॉस्पिटल दहा लाख भरा नाहीतर आम्ही तुम्हाला अॅडमिट करणार नाही असं म्हणतं, अशा हॉस्पिटलचं काही देणं आहे का महापालिकेला, आयटीला, अजून कोणाला -कोणाला हे देखील समोर आलं पाहिजे, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.