लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, 2100 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गंत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तसेच राज्यातील इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे, त्यामुळे आता या योजनेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

जर राज्यात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो तर महिलांना या योजनेंतर्गत 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली. आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो असा अंदाज होता, मात्र अजूनही घोषणा करण्यात आलेली नाहीये. आता या योजेबाबत बोलताना महिला  आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलं  आहे.  दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही. ही योजना सुरूच राहणार आहे.  2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच  विरोधकांच्या नजरेत खुपत आहे.  योजना लागू झाल्यापासून विरोधकांनी कधीच योजनेची प्रशंसा केली नाही. विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य या योजनेवर काढत आहेत, असा हल्लाबोलकही त्यांनी यावेळी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी कळसूआई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी ही माहिती दिली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)