मध्य रेल्वेवर येणार एक नवीन स्थानक, बदलापूरहून अवघ्या 30 मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार

मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच पुढील स्टेशन – कासगाव अशी घोषणा ऐकू येणार आहे. कारण कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी रेल्वेकडून सर्वेक्षणही सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे बदलापूरकरांना नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे.

बदलापूर शहरातून दररोज हजारो प्रवासी नवी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त ये-जा करतात. या प्रवाशांना रेल्वेने जायचं असल्यास त्यांना ठाण्यावरून लोकल बदलून जावं लागतं. तसेच जर रस्तेमार्गाचा वापर केला तर NMMT च्या निवडक बस सेवा उपलब्ध आहेत. मात्र या बसला शिळफाटा किंवा तळोज्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी सध्या दीड तासांचा वेळ लागतो.

पण आता लवकरच कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कासगावपासून नवी मुंबईला जोडणारा रेल्वेमार्ग झाल्यास नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचता येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. यानंतर रेल्वेनं या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच ‘पुढील स्टेशन – कासगाव’ ही उद्घोषणा लोकलमध्ये ऐकू येणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)