महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर व्हावी, यासाठी भाजपकडून मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सूचक विधान केले आहे. भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केले आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपने एकनाथ शिंदेना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.