प्रतिनिधी, पुणे : मागील आठवड्यात जोराच्या पावसानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली आहे. काकडी, दोडका, कारले, शिमला मिरची आणि मटारच्या दरांत घसरण झाली आहे. सर्व पालेभाज्याही स्वस्त झाल्या आहेत.पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची १०० ट्रक आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून पावटा आणि घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर ७ ते ८ टेम्पो आणि मध्य प्रदेशातून लसणाची ५ ते ६ टेम्पोंची आवक झाली. सातारी आल्याची ५०० ते ६०० गोण्या, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, शिमला मिरची १० ते १२ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भुईमुग शेंग एक टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक; तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ४० टेम्पोंची आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्या स्वस्त
तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबीर, करडई, राजगिरा आणि चवळईच्या दरांत घट झाली आहे. अंबाडीचे दर वाढले असून, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिना, मुळा, चुका आणि पालकचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीची दोन लाख जुड्या आणि मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली.
कलिंगड, खरबूज, सीताफळाच्या दरांत वाढ
कलिंगड, खरबूज आणि सीताफळाच्या दरांत वाढ झाली असून, लिंबू, चिकू आणि पेरूच्या दरांत घट झाली आहे़ अननस, मोसंबी, संत्री, डाळिंब आणि पपईचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पावसामुळे ओल्या फुलांची आवक
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात पडत असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डातील फुलबाजारात ओल्या फुलांची आवक होत आहे़. झेंडूचे दर निम्म्याने घसरले आहेत. अन्य सर्व फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.