उमरेडमध्ये खळबळ! घराच्या छतावर आकाशातून कोसळला 50 किलो धातुचा तुकडा; घटनेने चर्चेला उधाण, UFO की विमानाचा भाग?

आकाशातून घराच्या छतावर ५० किलोचा तुकडा आदळलाImage Credit source: टीव्ही ९ मराठी

नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमरेड येथील कोसे लेआऊट परिसरात शनिवारी भल्या पहाटे 4 वाजता 50 किलो धातुचा मोठा तुकडा एका घराच्या छतावर कोसळला. आकाशातून हा तुकडा या घराच्या गच्चीवर पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील अनेक जण घाबरून घराबाहेर आले. स्थानिक अमेय बसेशंकर यांच्या घरावर हा धातुचा तुकडा आपटला. त्यामुळे भिंतीचा काही भाग तुटला. या घटनेनंतर हा तुकडा कशाचा याची चर्चा रंगली आहे. हा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. या तुकड्याचा आता तपास होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस घटनास्थळी

दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा धातुचा तुकडा कशाचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या तुकड्याची पाहणी केली. त्यानंतर हा तुकडा आता पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे. हा धातुचा तुकडा 50 किलो वजनाचा आहे. या तुकड्याची जाडी 10 ते 12 मिलीमीटर तर तो 4 फूट लांब आहे. याप्रकरणी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हा तुकडा कशाचा आहे आणि हा तुकडा नेमका कशाचा याचा आता तपास करण्यात येत आहे.

तुकडा नेमका कशाचा?

हा तुकडा नेमका कशाचा? यावरून एकच चर्चा होत आहे. या तुकड्याची आता परिसरात चर्चा होत आहे. काही जण हा तुकडा विमानाचा असल्याचा दावा केला आहे. या तुकड्याची पाहणी केली असता एक जाड लोखंडी तुकडा पत्रा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. काही जण हा तुकडा UFO चा असल्याचाही दावा करत आहे. तर काही जणांनी हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा भाग असू शकतो असा दावा करण्यात येत आहे. हा तुकडा पडल्यानंतर बराच वेळ गरम होता. भल्या पहाटे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक घराबाहेर पडले. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)