राज्यात हा विषय गाजत असताना बुधवारी सायंकाळी या विषयावर भालगावमध्ये ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. भालगावचे गावचे सरपंच पोपट रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. त्यामध्ये खेडकर यांच्या पाठीशी राहण्याचा ठराव करण्यात आला. या सभेला बाळू खेडकर, पार्वती खेडकर, राजू सानप, विकास पारखे, नारायण खेडकर, अनिता रोकडे, विकास पारखे, रावसाहेब खेडकर, दिलीप खेडकर, उद्देश मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या सोशल मीडियातून दिलीप खेडकर व डॉ. मनोरमा खेडकर यांच्या विषयी बदनामीकारक मजकुर येत आहे. त्या आधारे प्रसारमाध्यमांतून एकांगी बातम्या दिल्या जात आहेत, असे सांगून याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मनोरमा खेडकर यांचा पुणे जिल्ह्यातील रिव्हॉल्वर दाखवितानाचा व्हिडिओ व्हायर होत आहे, ते अर्धसत्य आहे. या प्रकारापूर्वी त्यांच्यावर तेथील लोकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांनी शस्त्र बाहेर काढले. मात्र, व्हायरल व्हिडिओ अर्धवट दाखविण्यात येत आहे, असा दावाही ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व परिस्थितीत भालगावचे सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य खेडकर कुटुंबाच्या पाठीशी आहोत. खेडकर कुटुंबावर जो अन्याय सुरू आहे तो बंद करावा, अन्यथा गावात असलेल्या मंदिरासमोर आमही साखळी उपोषण करू, असा इशाराही सभेत देण्यात आला. याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.