लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी उन्हाळ्यात दोन वेळा चार आणि तीन टीएमसी असे ७.४० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे ४५ ते ५० दिवस पाणी सोडण्यात येणार होते. २४ एप्रिल रोजी ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होईपर्यंत ११०५ क्युसेक, तर ८ आणि ९ मे रोजी ९०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ग्रामीण भागासाठी नियोजनापेक्षा १५ दिवस जास्त पाणी सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
उन्हाळी हंगामात ग्रामीण भागासाठी ७.४० टीएमसी पाणी मंजूर होते. पहिल्या उन्हाळी आवर्तनात ४.९० टीएमसी आणि दुसऱ्या आवर्तनात अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. इंदापूर, दौंड, बारामतीमधून पाण्याची मागणी होती. पहिल्या आवर्तनात ५.९ टीएमसी पाणी वापरण्यात आले. उर्वरित पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग