कणखर लढणारी बाई असली तरी लेकीसाठी हळवी आई उफाळून येते, सुषमा अंधारेंची लेकीसाठी खास कविता

मुंबई: आज संपूर्ण जगात मदर्स डे साजरा केला जात आहे. तर राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक अशा महिला नेत्या आहेत ज्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने आपल्या पोरांना वेळ देऊ शकत नाहीत. यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमा अंधारे या सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्या आपल्या लेकीसोबत वेळ घालवू शकत नाहीये. त्यामुळे आज मदर्स डे च्या निमित्ताने त्यांनी आपल्या मुलीसाठी एक पोस्ट लिहिली आहे.

लोकसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रवास.. भाषणं.. बैठका.. माध्यमांशी संवाद… त्या त्या मतदार संघातील कळीचे मुद्दे.. महत्वाच्या व्यक्ती.. संदर्भ घटना.. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठीचे युक्तिवाद अशा कितीतरी गोष्टी एकाचवेळी चालु आहेत….. अन् दुसरीकडे लेकीला उन्हाळी सुट्ट्या लागल्यात. मम्माची वाट बघुन बघून सगळी चित्रकलेची वही रंगवून झालीय. Brain storming books सोडवून झालेत. घरात खेळता येतील असे शैक्षणिक खेळ पुन्हा पुन्हा खेळायला जीव कंटाळलाय तिचा..! मला तिचा हा कृत्रिम quarantine काळ तिच्यासाठी अन् माझ्यासाठी किती असह्य आहे हे कळतंय. या सगळ्या धावपळीत आपल्या पेक्षा तिचं डेडिकेशन फार मोठं आहे हे ही समजू शकते. पण, अजून आठ दिवस ताकदीने लढावंच लागेल… हे माझ्यापेक्षा जास्त समंजसपने तिने स्वीकारलय..

ती पहिल्यांदा चालायला लागली तेव्हा फोन वर भावजयीने सांगितलं.. तिला पहिला दात आला तो माझ्याआधी माझ्या भावाने बघितला. तिचे दोन्ही वाढदिवस नीट साजरे नाही करता आले. पण ती जाम खुश असते. मम्मा घरी आहे म्हटल्यावर केसांना तेल लावण्यापासुन ते औषध हातावर ठेवण्या पर्यन्त उत्साहात करते. तिचा ६व्या वर्षातला समंजसपणा बघुन भारी वाटतं.. काळजी वाटते.. काळीज कापरं होतं…. मोत्यासारखे हस्ताक्षर असणारी लेक मी नसले की मला इंग्रजीत माझ्यासाठी छान पत्र लिहीते..

जातक, तेनाली रामन, अकबर बिरबल, पंचतंत्र वाचून झालंय. आता बहुतेक सुधा मूर्तीच्या गोष्टी वाचते ऐकते पुन्हा नीट आठवून सांगायचा प्रयत्न करते..!
प्रवासात रिकाम्या वेळात आठवण आली की मी लेकीसाठी लिहिते.. कणखर लढणारी बाई असली तरी लेकिसाठी हळवी आई उफाळून येते.. मातृत्वाचा अर्थ तिच्यामुळेच लाभलाय.

ही कविता लेकिसाठीच… (याला विहिण गीत ही म्हणतात.. अर्थात् लेकीची सासरी पाठवणी करताना आईच्या भावना काय असु शकतात .. )

असा झुलावा चांदवा मनी घुमता पारवा
आला मनीच्या गाभारी पुन्हा फुलून ताटवा

असं गीत येई ओठी कहाणी दर्दभरी मोठी
कधी सुखाचा वखुत यील तिच्या घरासाठी

अशी होई कुजबुज चाले चारचौघी मध्ये गूज
गोष्ट सासरची निघे तिच्या गालावर लाज

असं हरिणीचं पाडस डोळा आठव पाऊस
तिच्या एका हट्टापायी अडे माऊलीचा श्वास

अशी अवखळ नदी कुणी घातला ग बांध
रानपाखराला बंदी, झालं भिरभिरणं ही बंद

ओलं हळदीचं अंग सख्या सोबतीनी संग
आला मांडवाच्या दारी जणू जलशाचा रंग

माय अलाबला घेती तिच्या हुंदका उरात
रीत घराण्याची सांगे तिच्या हळूच कानात

झाली सप्तपदी फेर तिच्या मनामंदी मोर
लेक घेवून चालला कुण्या गावाचा हा चोर

सासरचं मोठं घर माप उंबरठ्यावर
जोडताना नवी नाती तिचं मन सैरभैर..

Miss you Shona… Mumma loves you 💕

_सुषमा अंधारे
(चिमुकल्या लेकीची आई)