मावळात विजांचा कडकडाट, मेघगर्जना
मावळ तालुक्यात शनिवारी सायंकाळी ठिकठिकाणी सोसाट्याच्या वारा, विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. सायंकाळी सात ते साडेसात वाजता तळेगाव, नवलाख उंबरे, वडगाव, देहूरोड, कामशेत, मळवली व लोणावळा भागांत जोरदार पाउस पडला.
भोरमध्ये जोरदार
भोर आणि परिसरात साडेपाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. अर्धा तास रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. विसगाव, अंबवडे, हिरडोशी खोरे, पूर्व भागात पाऊस पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
झाडे पडली
वादळी पावसामुळे शहरात दोन दिवसांत ५४ झाडे पडली. शनिवारी दिवसभरात झाडपडीच्या ३० घटना घडल्या. शनिवारवाड्याच्या तटबंदीवर झाड पडल्याने बांधकाम थोडेसे ढासळले.
विविध भागांतील रात्री पावणेआठपर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
पुणे – ४०.४
लोहगाव – ४०.४
तळेगाव – ५८.५
हडपसर – ५०.५
वडगाव शेरी – ४१
राजगुरूनगर -३८
मगरपट्टा – ३४
हवेली – १८.५
आजही पावसाची शक्यता
पुढील दोन दिवस पावसाला अनुकूल वातावरण असल्याने आकाश अंशत: ढगाळ राहील. रविवारी दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.