मावळात विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
मावळ तालुक्यात शनिवारी सायंकाळी ठिकठिकाणी सोसाट्याच्या वारा, विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. सायंकाळी जोरदार वारा वाहू लागला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. दुपारी साडेचारच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सायंकाळी सात ते साडेसात वाजता तळेगाव, नवलाख उंबरे, वडगाव , देहूरोड, कामशेत तसेच मळवली व लोणावळा भागात जोरदार पाउस पडला. पावसामुळे शनिवारी ठिकठिकाणी सुरू असलेल्या विवाह सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.
भोरमध्ये जोरदार पावसाची हजेरी
भोर आणि परिसरात साडेपाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पंधरा दिवसापासून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.गेल्या आठवड्यात काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. त्यामुळे हवेतील उष्मा अधिक वाढला होता. शनिवारी झालेल्या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. अर्धा तास रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते.विसगांव, अंबवडे, हिरडोशी खोरे, पूर्व भागात पाऊस पडल्याचे नागरिकांनी सांगितले.
झाडे पडली
वादळी पावसामुळे शहरात दोन दिवसात ५४ झाडे पडली. तर शनिवारी दिवसभरात झाडपडीच्या ३० घटना घडल्या. लोहगाव, ढोले पाटील रस्ता, पद्मावती पंपिंग स्टेशन, सहकार नगर, औंध, गुरुवार पेठ, एनआयबीएम रस्ता, घोरपडी पेठ, कसबा पेठ, धानोरी, कर्वेनगर, खडकमाळ आळी, महात्मा गांधी रस्ता, शिवाजीनगर, महर्षीनगर, राजेंद्र नगर, विमाननगर, बाणेर आणि शनिवार वाड्यासह विविध ठिकाणी झाडपडी झाली. यात कोणीही जखमी नाही. शनिवार वाडा येथे तटबंदीवर झाड पडल्याने बांधकाम थोडेसे ढासळले.
शहराच्या वेगवेगळ्या भागात रात्री ८.४५ पर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटर)
पुणे ४०.४
लोहगाव ४०.४
तळेगाव ५८.५
हडपसर ५०.५
वडगाव शेरी ४१
राजगुरूनगर ३८
मगरपट्टा ३४
हवेली १८.५