सुप्रिया सुळे vs सुनेत्रा पवार, बारामतीकरांचा कौल कोणाला? यंदा मतदानाचा आकडा वाढला, वाढत्या मतांचा फायदा कोणाला

दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे १ लाख १४ हजारांनी मतदान वाढले आहे. ही वाढलेली मते तुतारी की घड्याळाची यावरून सध्या मतदारसंघात पैजा लागल्या आहेत. बाारामती लोकसभा मतदार संघात यंदा ५९.५० टक्के मतदान झाले आहे. गतवेळी ते ६१. ०७ टक्के इतके झाले होते. मतदानाचा टक्का घसरलेला असला तरी मतदान मात्र १ लाख १४ हजारांनी वाढले आहे. ही वाढलेली मते कोणाची यावर आता विचारमंथन केले जात आहे.राष्ट्रवादीतील फूटीनंतर गतवर्षी शरद पवार यांच्याकडे त्यांच्या होम ग्राऊंडवर एकही पदाधिकारी नव्हता. परंतु अवघ्या नऊ महिन्यात शरद पवार यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर ही परिस्थिती बदलून टाकली. अजित पवार यांच्या गटाचे एकहाती प्राबल्य असणाऱ्या बारामती तालुक्यात त्यांनी दिलेली टक्कर महत्त्वपूर्ण ठरली. भावनिक लाटेवर ही निवडणूक नेण्यात पवार कुटुंब यशस्वी ठरले.
सत्ताधाऱ्यांची अवस्था अवकाळी पावसासारखी, सगळं काही उद्ध्वस्त करतात; विजय वडेट्टीवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
समोरून अजित पवार विकासाचा मुद्दा मांडत असतानाही मतदारांना तो फारसा भावला नाही. अजित पवार यांच्याकडून होत असलेले मोदींचे कौतुक मतदारांना पसंत पडले नाही. ज्या मोदींनी मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला, आणि त्यानंतर अवघ्या आठवडाभरात अजित पवार महायुतीत सहभागी झाले, त्यांचे अजित पवार कोड कौतुक करतात, याचेच मतदारांना आश्चर्य वाटले.

भाजपकडून ४०० पारचा नारा देण्यात आला होता. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना तो फारसा भावला नाही. निवडणूकीच्या सुरुवातीलाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत आम्हाला शरद पवार यांचा पराभव महत्त्वाचा वाटतो, असे विधान केले. त्याचे मोठे पडसाद उमटले. इंदापूर तालुक्यात येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांना आपल्याकडे खेचण्याची कृती मतदारांना बरेच काही सांगून गेली. जो माणूस आठवडाभरापूर्वी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होता, तो अचानक महायुतीचे गोडवे गायला लागला. त्याचा योग्य तो अर्थ मतदारांनी घेतला.
आई-वडिलांच्या निधनानंतर सापडले तीन कोटी, पण… बँकेचं लॉकर पाहून सर्वच चक्रावले
दौंड तालुक्यात आमदार राहूल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांचे मनोमिलन मतदारांना पचणी पडले नाही. या दोघांसाठी त्यांच्या समर्थकांनी आजवर नेहमीच स्वतःची डोके फोडून घेतली. तेच नेते एकमेकांना पेढा भरवू लागले. परिणामी मतदारांनी आपला स्वतःचा निर्णय घेतला.

पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत बंडाचे निशाण फडकावले. अजित पवार यांच्यावर त्यांनी अत्यंत जहरी टीका केली. त्यानंतर सपशेल माघार घेत ते अजित पवार यांचेच गोडवे गावू लागले. त्यामुळे विजय शिवतारे महायुतीसोबत गेले तरी त्यांचे मतदार मात्र गेले नाहीत, अशी स्थिती दिसून आली. तेथील काँग्रेसचे आमदार संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिले. परिणामी तेथे सुळे यांचे पारडे जड ठरले. भोरमध्ये शरद पवार यांनी कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांची भेट घेत मनोमिलन घडवले. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी आपली पूर्ण ताकद सुळे यांच्या मागे उभी केली. परिणामी भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात सुळे यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा आहे.

खडकवासला हा शहरी मतदारसंघ आहे. येथील आमदार भाजपचे भीमराव तापकीर आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे या मतदारसंघात मागे पडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी गेली तीन वर्षे येथे सातत्याने संपर्क ठेवला. अजित पवार गटाची भिस्त येथे भाजपवर होती. परंतु कमळाचे चिन्ह नसल्याने भाजपचे मतदार घराबाहेर पडलेच नाहीत. परिणामी येथील मताची टक्केवारी ५१ वरच थांबली. येथून जे अपेक्षित लिड अजित पवार यांना अपेक्षित होते. ते मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.