उच्चशिक्षितच लक्ष्य
सायबर चोरट्यांनी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना (इंटरपोल), सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसांच्या नावाचा वापर करून नागरिकांना गंडा घालण्याचे गोरखधंदे आरंभले आहेत. ‘विदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले’, ‘तुमच्या बँक खात्यात बोगस आर्थिक व्यवहार झाले आहेत’ किंवा ‘तुमच्या मोबाइलवरून आक्षेपार्ह कॉल झाले आहेत,’ अशा भूलथापा मारून सायबर चोरटे कारवाईची भीती घालतात. त्यानंतर विविध अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून संबंधितांच्या बँक खात्यावर दरोडा घालतात. गेल्या दोन महिन्यांत अशा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंत्यांपासून अनेक उच्चशिक्षित नागरिक बळी पडले आहेत.
आजवर घडलेले प्रमुख गुन्हे
– सीबीआयची बोगस नोटीस पाठवून औंधमधील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
– ‘डीपी’ला मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह लावून ‘व्हॉट्सअॅप’द्वारे संपर्क. कुरिअरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक.
– ‘तुमच्या नावाने मुंबई येथून पाठवलेले पार्सल कस्टममध्ये अडकले असून, त्याचा संबंध दहशतवादाशी आहे,’ अशी भीती घालून कोरेगाव पार्क येथील ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक.
माजी महापौरांनाही गंडा घालण्याचा प्रयत्न
शहरातील एका माजी महापौरांना गेल्या आठवड्यात सायबर चोरट्यांनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावावर दोन सिमकार्ड असून, त्यातील एका सिमकार्डवरून गैरकृत्य झाल्याची थाप त्यांना मारण्यात आली. याशिवाय या माजी महापौरांनी अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही सायबर चोरट्यांनी सांगितले. संबंधित चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून माजी महापौरांना दीड ते दोन तास घोळात घेतले. त्यानंतर त्यांची बँक खाती तपासण्याचा बहाणा करून ‘नेट बँकिंग’चे तपशील आणि आणि एटीएम कार्डची माहिती विचारली. त्यावर माजी महापौरांनी मी केवळ ‘चेक’द्वारे व्यवहार करीत असल्याचे सांगितले. आपली डाळ शिजत नसल्याचे पाहून चोरट्यांनी कॉल कट केला.