शिवरायांना हार घातला, हवेतच ट्रॉली बिघडली, जयंतराव-रोहिणीताई बचावल्या, अमोल कोल्हेंना दुखापत

 

पुणे (जुन्नर) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा किल्ला शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रारंभ झाला आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुतळ्याला हार घालून जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे क्रेनच्या ट्रॉलीमध्ये चढले होते. हार घातल्यानंतर ट्रॉली खाली घेताना त्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला.क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने ट्रॉली जरा तिरकस झाली आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. क्रेनचालकाने वेळीच समयसुचकता दाखवून ट्रॉलीला हळूच खाली घेतलं. हा सर्व प्रकार बघून खाली उपस्थित असलेल्यांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने सर्व बचावले मात्र, अमोल कोल्हेंना थोडी दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. त्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करण्यात आली. शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन हे सर्व नेतेमंडळी जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले होते. सर्वे नेतेमंडळी क्रेनला असलेल्या ट्रॉलीच्या सहाय्याने वर चढले होते. हार घालून खाली येताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचा तोल गेला. त्यात जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख सुखरूप असून अमोल कोल्हे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती. ट्रॉलीचा नट निसटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने देखील जनसंवाद यात्रा सुरू केली असून कुणाच्या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.