गावागावांत, पाड्यावर, वाडी-वस्तीवर सगळीकडं माहिती झालंय की लाडकी बहीण अशी योजना आली आहे.गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते. पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. माझ्या माय-माउलींच्या पाठीशी मी आहे. कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाइलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी म्हटले. माझी विनंती आहे ते पैसे तुमच्या स्वत:साठी खर्च करा, वर्षभरासाठी ४६ हजार कोटी रुपये आपण खर्च करीत आहोत. विरोधकांकडून टीका केली जातेय की हा चुनावी जुमला आहे, पण मी तुम्हाला सांगतो, हे तात्पुरते नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या.
वायरमनला माझे नाव सांगा
राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळाले नाही, अशी ओरड सुरू केली. मात्र, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीजबिल भरावे लागणार नाही. एवढंच नव्हे, तर आतापर्यंत थकबाकी असलेले बिल भरण्याची गरज नाही असे सांगत वायरमन आला तर त्याला माझे नाव सांगा असे पवार यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना विजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सौरऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.
१५०० रुपयांच्या धनादेशाचे अनावरण
जनसन्मान यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमात पाच महिलांनी अजित पवार यांना राख्या बांधल्या. यावेळी १५०० रुपयांच्या धनादेशाचे अनावरण करीत बहिणींना रक्षाबंधनला भेट मिळणार अससल्याचे जाहीर करण्यात आले. जनसन्मान यात्रा गुलाबी अन् पिवळ्या रंगाने खुलली होती. दरम्यान, आज, ९ ऑगस्ट रोजी आदिवासीदिनी आदिवासीबहुल भाग असलेल्या नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, रायगड, पुणे, नांदेड, हिंगोली, अमरावती, नागपूर, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा येथील जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक सुटीचे आदेश देण्यात आल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.