‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांमध्ये त्रुटी; १५ लाख लाभार्थ्यांची बॅंक खाती चुकीची किंवा बंद
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी पात्र ठरलेल्यांच्या खात्याची माहिती आणि बँक खात्यांची पडताळणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून १ रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली. मात्र, एक कोटी लाभार्थ्यांपैकी तब्बल १५ ते १६ लाख खात्यांमध्ये पैसे पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. खाते क्रमांकातील चूक, बंद खाते यांसारखी कारणे यामागे असून, त्यात दुरुस्ती-सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवारपर्यंत राज्यभरातून एकूण १.४५ कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. राज्य सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्ज स्वीकारणे व त्यांची छाननी करतानाच चाचपणीसाठी वैध अर्जांच्या बँक खात्यात १ रुपया पाठवण्यात आला. मात्र, १५ ते १६ लाख बँक खात्यांमध्ये हा १ रुपया पोहोचलाच नसल्याची माहिती आहे. बंद असलेले बँक खाते, बँक खात्याची माहिती चुकीची देणे, खात्याचा एखादा अंक चुकल्याची शक्यता असणे, दोन वेळा अर्ज करणे अशा विविध त्रुटींमुळे हे घडल्याचे विभागाच्या लक्षात आले आहे. विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत असून, या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवताना साधारणतः किमान १५ ते कमाल २० टक्के अर्जदारांबाबत अशा त्रुटी राहू शकतात. ही योजना राबविताना विभागाने ही बाब विचारात घेतली आहे. या प्रत्येक अर्जदाराच्या बाबतीत नेमकी काय त्रुटी आहे, हे पाहून ती दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. क्षुल्लक त्रुटींमुळे एकही अर्जदार महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
राज्यभरातून १.२९ कोटी अर्ज वैध
                 आत्तापर्यंत राज्यभरातून १.२९ कोटी अर्ज वैध ठरले आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ९.७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून ८ लाख, अहिल्यादेवी नगरमधून ७ लाख, तर सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून ६ लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असून, त्यांची छाननी सुरू आहे. थेट बँक खात्यात योजनेचे पैसे पोहोचवताना अशा प्रकारच्या त्रुटी विचारात घेऊन नियोजन केले जाते. परंतु, अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. १५ ते १९ ऑगस्टदरम्यान योजनेचे पैसे देण्याचा आमचा प्रयत्न असून, किमान १ कोटी महिलांच्या खात्यात ‘डीबीटी’ करण्याचा मानस आहे. – आदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास विभाग