Har Ghar Tiranga: भाजपतर्फे राज्यभर ‘हर घर तिरंगा’; एक कोटी घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याची माहिती या अभियानाच्या प्रदेश संयोजक आ. उमा खापरे यांनी सोमवारी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.हर घर तिरंगा अभियान…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत एक कोटी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंतचे नियोजन

९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत.

मेरा वचन, मेरा शासन
फडणवीस साधणार महिला भाविकांशी संवाद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रावण महिन्यात एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे . श्रावणातील दर सोमवारी शिवमंदिरांमध्ये ‘मेरा वचन, मेरा शासन’च्या बॅनरखाली फडणवीस एक नवे आश्वासन देणार आहेत . या माध्यमातून राज्यातील जवळपास चार कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे .

अमित शहा यांचे नागरिकांना आवाहन
हर घर तिरंगा’ मोहिमेने प्रत्येक भारतीयामध्ये मूलभूत एकात्मता जागृत करणाऱ्या राष्ट्रीय चळवळीचे रूप धारण केले असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून सेल्फी घ्यावा आणि त्याचे छायाचित्र harghartiranga.com या वेबसाइटवर अपलोड करावे, असे आवाहन शहा यांनी केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोहिमेने गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय चळवळीचे रूप धारण केले आहे. या मोहिमेने देशभरातील प्रत्येक भारतीयामध्ये मूलभूत एकात्मता जागृत केली आहे. मी सर्व नागरिकांना या चळवळीला आणखी बळ देण्याचे आणि पुन्हा त्याच उत्साहाने यात सहभागी होण्याचे आवाहन करतो,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.