नाशिक जिल्ह्यातील अर्धे प्रकल्प फुल्ल, नगरकरांच्या आशा पल्लवित
 नाशिक : जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार वर्षावामुळे एकूण पाणीसाठा ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट असून, सध्या ३७ हजार ४८५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अर्ध्यावरील प्रकल्प फुल्ल झाल्याची गोड बातमी कानावर येताच नगरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, मुख्य गोदावरीचे खोरे पाण्याने वाहू लागेल, नगरकरांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी अशा जागृत झाली आहे.धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाले की वर्षभराची पाणीचिंता मिटते. परंतु पावसाळा सरूनही धरणे भरली नाही तर काही भागांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्यांना वर्षभर सामोरे जावे लागते. जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पावसाळा सुरू झाला असला तरी पाणलोट क्षेत्र मात्र कोरडेच होते. गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन-चार दिवसांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांमधील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. नगर जिल्हा तास पावसापासून वंचितच राहीला आहे.

शेती, उद्योगांची पाण्याची गरज, तसेच लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात चार धरणे आहेत. या धरणांमधील एकूण पाणीसाठा ८ हजार १८ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी ५ ऑगस्टला या समूहामध्ये ७ हजार ८३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा तो नऊ टक्के अधिक आहे. गंगापूर धरण ८६ टक्के, तर गौतमी गोदावरी ८७ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या धरणात केवळ ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा तो ३६ टक्के अधिक आहे. काश्यपीमध्ये ५१ टक्के, तर आळंदी धरणात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पालखेड धरण समूहातील तीसगाव धरण रविवारपर्यंत (दि. ४) कोरडे होते. रविवारी पाणलोट क्षेत्रात दिवसभर झालेल्या पावसामुळे या धरणात २९ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गिरणा धरण समूहातील नागासाक्या धरणाची पाणी साठवण क्षमता ३९७ दशलक्ष घनफूट असली, तरी हे धरण अजूनही कोरडेठाक आहे. याशिवाय ३३५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या माणिकपुंज धरणही कोरडे असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणातील पाणीसाठा २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची साठवण क्षमता आहे. सध्या त्यात ४ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के)
धरण पाणी

गंगापूर ८६
काश्यपी ५१
गौतमी गोदावरी ८७
आळंदी ७४
पालखेड ६३
करंजवण ५५
वाघाड ७२
ओझरखेड ३३
पुणेगाव ७६
दारणा ८४
भावली १००
मुकणे ५२
वालदेवी १००
कडवा ८१
भोजापूर ९६
चणकापूर ७४
हरणबारी १००
केळझर १००
गिरणा २६
पुनद ५०
तीसगाव ६
नागासाक्या ००
माणिकपुंज ००
एकूण ५७