मानधन देता येत नसेल, तर विष द्या…! नाशिकच्या ज्येष्ठ कलाकारांकडून उद्विग्नता व्यक्त

 नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. अनेकांना मोबाइलवर ओटीपी येत नसल्याने अर्ज करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही तांत्रिक अडचण त्वरित दूर करावी व अर्जाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे. तसेच अनेकांचे मानधन रखडल्याने अनेकांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.आयुष्यभर जनतेच्या मनोरंजनासाठी काम केले. जीवाची पर्वा केली नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ लोकांची मने रिझवत कार्यक्रम केले. मात्र आमच्या आयुष्याची ‘संध्याकाळ’ अंधारलेलीच राहिली. ‘मानधन वेळेवर देता येत नसेल तर विष तरी द्या,’ अशी उद्विग्नता शहरातील एका ज्येष्ठ कलाकाराने व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी मार्च २०२३ या अर्थिक वर्षात १०० कलाकार पात्र ठरले. यापूर्वी ७०० कलाकारांना मानधन मिळत आहे. सद्यस्थितीत त्यांची संख्या ८०० झाली आहे. मात्र या कलाकारांना कधीही वेळेवर मानधन मिळत नाही. ज्येष्ठ कलाकारांना मानधन देण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती तयार करण्यात आली. या समितीच्या मान्यतेने कलाकारांना दरमहा मानधन दिले जाते. जिल्ह्यातील कलाकारांना मानधन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समिती नेमण्यात आली. या समितीने मार्च महिन्यात सर्व कलाकारांची यादी सरकारला सादर केली. तरीही मानधन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली.

कलावंतांची परिस्थिती हलाखीची

अनेक कलावंतांना वयानुसार व्याधी जडल्या आहेत. काहींना मधुमेह, तर काहींना उच्च रक्तदाब आहे. या सर्वांचा सामना करण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपयांची औषधे लागतात. अगोदरच कलावंतांची परिस्थिती हलाखीची असल्याने हा खर्च डोईजड होतो. त्यामुळे दर महिन्याला नियमित मानधन मिळाले, तर थोडाफार हातभार लागेल अशी कलावंतांची भावना आहे.

…..

असे मिळते मानधन

‘अ’ वर्ग ३ हजार ९५०

‘ब’ वर्ग २ हजार ७५०

‘क’ वर्ग २ हजार २५०

सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून ज्येष्ठ कलावंतांची यादी राज्याच्या वित्त विभागाकडे पाठवली जाते. तेथून हा निधी जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयाकडे पाठवला जातो. तेथून कलावंतांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. वित्त विभाग दर महिन्याला पैसे पाठवत नाही. तीन महिन्यांतून एकदाच पाठवले जातात, त्यामुळे कलावंतांचे हाल होत आहेत.