अजित पवार पर्स सांभाळणारा वाटतो का रे…? दादांच्या निशाण्यावर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार

दीपक पडकर, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या प्रचाराची सांगता करताना आज आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना चांगलेच लक्ष्य केले. शरद पवार यांच्या सांगता सभेमध्ये रोहित पवार यांचे भाषण झालं होतं. या भाषणादरम्यान रोहित पवार हे भावनिक झाले. त्याची नक्कल अजित पवारांनी त्यांच्या सभेत केली. तसेच पर्सवरून केलेल्या सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिले.

बायको संसदेत गेल्यावर नवरा काय पर्स सांभाळणार का? अशा आशयची टीका काहींनी माझ्यावर केली. अजित पवार काय पर्स सांभाळणारा वाटतो का रे…? असे उपस्थितांना विचारत सदानंद सुळे काय पर्स सांभाळतात का? अशी विचारणा करीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर पलटवार केला.
रोहित पवार रडले, अजितदादांनी मिमिक्री केली- ‘मी पण रडून दाखवतो, ये मला मतदान करा रे’

मी म्हणतो जाऊ द्या, जाऊ द्या…

ते म्हणाले, महिला लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा पर्स घेऊन जातो का? मला तर एकेकाला अशी उत्तर देता येईल की, पळता भुई थोडी होईल. मध्ये कुठे च थांबणार नाहीत, थेट मुंबई गाठतील… मी म्हणतो आपलीच भावंडे आहेत, जाऊ द्या, बहीण आहे जाऊ द्या, पण हे जरा जास्तच व्हायला लागलंय. हे चालणार नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.
अजितदादांनी १५ वर्षांचा हिशेब मागितला, सुप्रियाताईंनी १८ वर्षांचा हिशेब सांगत आरसा दाखवला!

रोहित पवार यांची मिमिक्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणामध्ये रोहित पवार यांच्या शरद पवारांच्या सभेतील रडण्याचा संदर्भ घेतला आणि रोहित पवार हे नाटक करत असल्याची टीका केली. त्यांनी रोहित पवारांची नक्कल करत डोळ्याने रुमाल पुसत असल्याचा अभिनय केला. अशी नाटकं करण्यापेक्षा तुम्ही तुमचे काम दाखवा. तुमचं नाणं खणखणीत वाजलं तर तुमच्या रडायची वेळ येणार नाही. हा तर केवळ रडीचा डाव झाला, मी आधीपासून सांगत होतो की, काही जण भावनिक करणार. आलं ना लक्षात? हे असलं चालत नाही बाबांनो.. असे म्हणत अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.
‘मूळ पवार आणि बाहेरच्या पवार’ अजितदादांच्या सख्ख्या वहिनीचं प्रत्युत्तर, महिला मेळाव्यात टाळ्यांचा कडकडाट

पर्स बायकोच सांभाळेल, मी तिच्याबरोबर जाऊन लोकांची कामे करून घेईन

बायको खासदार झाल्यावर नवरा पर्स सांभाळणार का, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. त्याचा संदर्भ देत ‘मी पर्स सांभाळणार नाही. पर्स बायकोच सांभाळेल. परंतु मी बरोबर जाईन आणि लोकांचे काम करून घेईन’, असे त्यांनी प्रत्युत्तर दिले.

फक्त मतदान होऊ द्या, यातले अनेक जण परदेश दौऱ्यावर जातील

प्रचारासाठी फिरणाऱ्या भावडांवरही नाव न घेता सडकून टीका केली. ‘सात मे रोजी मतदान झाले तर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्यांपैकी काही जणांनी विदेशी दौरा काढला नाही तर नावाचा अजित पवार नाही. या लोकांचे हे काम नाही. आता उगाच येतात. काही जण टँकर, चारा, पाणी देऊ म्हणतात. परंतु सात तारखेनंतर कोण तोंड दाखवितो ते पाहूच,’ असे खुले आव्हान त्यांनी दिले.