पुतण्याच्या रडण्याला काकांचं मिमिक्रीने उत्तर, अखेरच्या प्रचारसभेत नेमकं काय झालं?

बारामती : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत आक्रमक तितकेच आवेशपूर्ण भाषण करून भाजप आणि अजितदादा गटावर तुफान हल्लाबोल केला. सत्तेची लढाई नसून विचारांची लढाई असल्याचे सांगत ज्यावेळी अजित पवार भाजपला जाऊन मिळाले, त्या परिस्थितीतही शरद पवार खंबीर होते, ही आठवण सांगताना त्यांना रडू कोसळले. भर सभेतच त्यांना अश्रू अनावर झाले. हाच धागा पकडत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या अखेरच्या प्रचारसभेत रोहित पवार यांची मिमिक्री करून रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला.संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज, रविवारी (दि. ५) सहा वाजता थंडावल्या. तत्पूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या प्रचाराची शेवटची सभा बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी झाली. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने दोन्हीकडून प्रचारासाठी जोर लावला गेला. अजित पवारांनी विचार सोडल्याची टीका शरद पवार गटाने केली तर शरद पवारांनीच अनेक वेळा बोलणी करायला लावल्याचे सांगचत अजित पवार यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. राजकीय मुद्द्यांबरोबरच कौटुंबिक आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालेला बारामतीकरांना पाहिला. शेवटच्या प्रचार सभेतही पुतण्याच्या (रोहित पवार) रडण्याला काकांनी (अजित पवार) मिमिक्रीने उत्तर दिले.

‘मी पण रडून दाखवतो, ये मला मतदान करा रे’

मी आधीपासून सांगत होतो की काही लोक तुम्हाला भावनिक करतील. आज आमच्या पठ्ठ्याने डोळ्यात पाणी आणून दाखवलंच… पण हा रडीचा डाव झाला… मी पण रडून दाखवतो. ये मला पण मत द्या रे… पण रडारडीचा खेळ करून मतं मागायची असतात का..? तुमचं काम दाखवा ना.. त्यासाठी नाणं खणखणीत पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या रडण्याची मिमिक्री केली.

तुला राजकारणाचे बाळकडू आम्ही पाजले, दादांनी रोहित पवारांना सुनावले

याला जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिले. शरद पवार साहेब सांगत होते, अजिबात देऊ नको. मी साहेबांचं ऐकलं नाही. मी तिकीट दिलं. त्यानंतर म्हणाला हडपसरला विधानसभा लढवतो. आम्ही म्हणालो, तू कर्जत जामखेडला जा, आम्ही तिथं मदत करु. आम्ही तुला राजकारणाचे बाळकडू पाजले, तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा नक्कीच चार उन्हाळे पावसाळे जास्त बघितले ना… अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले.

रोहित पवार मंचावर का भावनिक झाले?

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही टीव्हीवर बातम्या पाहत होतो. एक एक नेता त्यांच्याकडे जात होता. त्यादरम्यान साहेबांना मी काही प्रश्न विचारत होतो. साहेब मला त्या प्रश्नांची उत्तरे देत होते. त्यावेळी स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्यासाठी जोपर्यंत नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांनी म्हटल्याची भावनिक आठवण रोहित पवार यांनी सांगितली. ही आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते हुंदक्यांनी दाटले होते. त्यावेळी मंचावरील कार्यकर्त्यांनी त्यांना शांत केले.