रोहित पवार म्हणाले, अजितदादांसोबत गेलो असतो तर मलाही मंत्रिपद मिळालं असतं पण मला सत्ता महत्त्वाची नव्हती. मला विचार महत्त्वाचे आहेत. वटवृक्षाला पारंब्या असतात, त्यातल्या एकदोन पारंब्या घेऊन गेले म्हणजे झाड घेऊन गेले असे होत नाही. आपला वटवृक्ष पवारसाहेब आहेत. त्यामुळे आपण लढू आणि जिंकू, असा विश्वास व्यक्त करतानाच रोहित पवार यांनी पक्षफुटीवेळचा भावनिक प्रसंग सांगितला.
नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही टीव्हीवर बातम्या पाहत होतो. एक एक नेता त्यांच्याकडे जात होता. त्यादरम्यान साहेबांना मी काही प्रश्न विचारत होतो. साहेब मला त्या प्रश्नांची उत्तरे देत होते. त्यावेळी स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्यासाठी जोपर्यंत नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांनी म्हटल्याची भावनिक आठवण रोहित पवार यांनी सांगितली. ही आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते हुंदक्यांनी दाटले होते. त्यावेळी मंचावरील कार्यकर्त्यांनी त्यांना शांत केले.
मला माझ्या पोरांनी विचारलं, तू आजोबांसोबत की काकासोबत?
ज्यावेळी पक्षात फूट पडली त्यावेळी मी आजोबाबरोबर की काकाबरोबर आहे? हे मला माझ्या मुला-मुलीने विचारले. त्यावेळी मी आजोबांसोबत असल्याचे मी त्यांना सांगितले. माझ्या मुलीने आणि मुलाने माझे स्वागत केले, बाबा म्हणून तुझा अभिमान असल्याचे त्यांनी मला सांगितले. १० वर्षांच्या मुलाला जे कळतं ते ६५ वर्षाच्या माणसाला का कळत नाही? असा टोलाही रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
….तर गाठ पवारसाहेबांची आणि आमच्याशी आहे
मी पळणारा व्यक्ती नाही, पळणारा असतो तर कधीच गेलो असतो, माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर गाठ पवारसाहेबांची आणि आमच्याशी आहे, असा दमही रोहित पवार यांनी अजितदादांना दिला.