नाशिकमधील  सहा धरणे तहानलेलीच!

 

नाशिक : सुमारे दोन महिन्यांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बहुतांश धरणांना भरती आली आहे. गंगापूर धरण ५० टक्क्यांवर तर गंगापूर धरणसमूहाने ४० टक्क्यांचा पल्ला गाठला असला तरीही जिल्ह्यात अद्याप सहा धरणे तहानलेलीच आहेत.

                                   जिल्ह्यातील धरणांपैकी पाच टक्के धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर, तर एका धरणाचा पाणीसाठा अवघा दोन टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील १८ धरणांमध्ये गुरुवारपर्यंत २० हजार १३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, हे प्रमाण ३०.६६ टक्के आहे. तर सहा धरणे अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाच धरणांचे खातेही उघडले नाही
पालखेड धरणसमूहातील ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, गिरणा खोरे धरणसमूहातील नागासाक्या, माणिकपुंज या पाच धरणांमध्ये शून्यटक्के पाणीसाठा आहे. तर पालखेड धरणसमूहातील भोजापूर धरणातही अवघा दोन टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकूण २४ पैकी १८ धरणे भरतीस लागली असून, सहा धरणे कोरडीठाक आहेत.

जिल्ह्यातील पाणीसाठा
धरणाचे नाव —————-टक्केवारी (%)

भावली ———————१००
नांदूरमध्यमेश्वर —————-१००
कडवा ———————८१.५८
दारणा ———————-८१.३१
पुनद ————————५०.८
गंगापूर ———————-४९.९५
गौतमी गोदावरी —————-४९.३०
वालदेवी ——————–४६.८७
मुकणे ———————-२७.७८
पालखेड ———————२४.३५
काश्यपी ———————२३.५४
वाघाड ———————-२२.३७
हरणबारी ——————-१९.९८
चणकापूर ——————-१४.३०
आळंदी ———————११.८९
गिरणा ———————-११.७
केळझर ———————८.५७
करंजवण ———————५.५९
भोजापूर ———————१.९४
एकूण ———————–३०.६६

चणकापूर धरणाला पावसाची प्रतीक्षा
कळवण :

                     कळवण तालुक्यात लहान मोठी सतरा धरणे असताना चणकापूरसारख्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव व पुढे जळगावपर्यंतच्या जनतेची ‘तृष्णा’ भागवणाऱ्या धरणात जुलैच्या अंतिम टप्प्यातही २१८ दशलक्ष घनफुट इतका म्हणजे केवळ १० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस नसल्याने या भागातील जनता हवालदिल झाली असून, यापुढे जर पावसाने अशीच वक्रदृष्टी ठेवली, तर मोठे जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ब्रिटिशकालीन असलेल्या चणकापूर धरणाच्या निर्मितीसाठी कनाशी हे स्वतंत्र गाव निर्माण झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ५१ वर्षांनंतर चणकापूर धरणाच्या जलपातळीत जुलैच्या अंतिम टप्प्यात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे जनतेसोबतच राज्यकर्त्यांचीही झोप उडाली आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी वर्गाने शंभर टक्के खरीप पेरणी केलेली असली तरी सद्यस्थितीत सुरू असलेल्या रिमझिम पावसावर पिके जमिनीशी नाते टिकवून आहेत. या धरणक्षेत्रात पाऊस न झाल्याने १४ हजार ४२ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहू शकते.

निफाड :

                  दारणा धरणातून नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी आल्यानंतर धरणातून गुरुवारी ८,८०४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत असल्याची माहिती मिळताच परिसरातून आलेल्या पर्यटकांनी येथे भेट देऊन धरणाखालच्या पुलावर धोकादायक सेल्फी काढत स्टंटबाजी करायला सुरुवात केल्याने अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या बेधुंद तरुणाईला आवर घालायला येथे कोणताही बंदोबस्त दिसत नाही. गोदावरी व दारणा नदीचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. मात्र, याठिकाणी सुरक्षारक्षक तसेच पोलिस नसल्याने येथे येणारे काही पर्यटक हे दारूच्या नशेत बेधुंद होऊन धरणाचे किनाऱ्यावर तसेच पुलावर उभे राहून जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी परिसरातून होत आहे.

देवळा :

                तालुक्यातील पश्चिम भागातील वाजगाव, वडाळा, खर्डे, कणकापूर, शेरी, कांचने, हनुमंतपाडा याठिकाणी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नदी-नाले, ओहळ तसेच पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलती नदीचे उगमस्थान असलेल्या हनुमंतपाडा या पाणलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडला नाही. यामुळे हनुमंतपाडा येथे अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. कोलती नदी अद्याप प्रवाहित झालेली नसल्याने खर्डे परिसरात वार्षि येथील पाझरतलाव कोरडाच आहे.

सटाणा :

                    पावसाळा सुरू होवून दोन महिने उलटले, राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना बागलाणवासीय आजही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. पाऊस नसल्याने सटाणा शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. बागलाण तालुक्यात येत्या आठ ते दहा दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. जास्त खरीप लाल कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात घेतले जाते. मात्र, या भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर ही दोन्ही धरणे अद्यापही कोरडेठाक आहेत. जुलै महिन्यातदेखील तालुक्यात ३२ गावांना पाण्याचे टँकर सुरू आहेत. पावसाअभावी लाल कांदा, मका, बाजरी, ज्वारीसह कडधान्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.