दुर्दैवी! पावसापासून अंडाभुर्जीची गाडी वाचवायला गेले, पुण्यात शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू
पुणे: पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने अनेक सखळ भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथे तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसात अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवायला गेले आणि विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या पुलाची वाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू

डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे या तिघांची अंडाभुर्जीची गाडी होती. रात्री अचानक जोरदार पाऊस आल्याने ते अंडाभुर्जीचा स्टॉलवर आवराआवर करायला परत गेले. तिथे गुडघाभर पाणी साचलेलं होतं. त्यातच त्यांना विजेचा धक्का लागून तिघांचाही मृत्यू झाला.

या घटनेत अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष २५, राहणार पुलाची वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय वर्ष २१ राहणार पुलाची वाडी डेक्कन), शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ नेपाळी कामगार) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याला पावसाचा रेड अलर्ट

येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागा दिला आहे. पुण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर पाण्यात अडकलेल्या लोकांना होडीच्या मदतीने बाहेर काढलं जात आहे. पावसाची परिस्थिती पाहता पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

पुण्यात रस्त्यांवर पाणीच पाणी

पहाटे साडेपाच पर्यंत पुण्यामध्ये ८५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे पुण्यात सखल भागात पाणी साचले आहेएकता नगरी सिंहगड रोड वरील १५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.