Tamhini Ghat Landslide: पुण्यात तुफान पाऊस, ताम्हिणी घाटात दरड कोसळली, एकाचा मृत्यू; गावांचा संपर्क तुटला
पुणे : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढला आहे. त्यात मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात मावळ आणि मुळशी तालुक्यात असणाऱ्या ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी गाव परिसरात दरड कोसळली आहे. यामध्ये एक व्यक्ती मृत तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.


आदरवाडी गाव हे मावळ तालुक्याच्या दुर्गम भागात आहे. या भागात आज पहाटेच्या सुमारास डोंगराचा मातीचा काही भाग तुटून रस्त्यावर आला आहे. रस्ता ते डोंगराच्या अंतर अंदाजे ५०० मीटर इतके आहे. त्यावर १० ते १२ फूट उंचीचा मातीचा थर रोडपर्यंत आला आहे. या परिसरात पिकनिक नावाचं हॉटेल असून या हॉटेलच्या भागांमध्ये हा कडा कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. मातीचा थर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असल्याने आता रस्ता मोकळा करण्यासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागणार आहे.प्रशासकीय यंत्रणेला पोहोचण्यासाठी या भागात अडथळे निर्माण होत असून दुर्गम भागामध्ये हे गाव आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून अनेक अडथळे निर्माण होत आहेत. दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात भोर वेल्हा मुळशी, मावळ या तालुक्यांमध्ये असणाऱ्या दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.