कोण आहेत संदीप वर्पे?
संदीप वर्पे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत. ते पवारांचे खंदे शिलेदार आणि विश्वासू मानले जातात. आतापर्यंत त्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर पक्षातील अनेक पदं भूषवली आहेत. संदीप वर्पे उच्चशिक्षित असून पेश्याने इंजिनियर आणि वकील आहेत. उच्चशिक्षित असल्याने शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवर त्यांना संधी दिली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले वर्पे?
आज संदीप वर्पे यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असून भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले आहे की, मी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन कोपरगाव विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तसेच आज शरद पवारांची भेट घेतली असता शरद पवारांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली आहे. आणि मला कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहे. २०१४ आणि २०१९ ला पक्षाने मला उमेदवारी संदर्भात विचारणा केली होती, मात्र त्यावेळेस मी इतरांची नावे सुचवली. मात्र यंदा पक्षाने जबाबदारी दिली तर पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे वर्पे यांनी म्हटले आहे.
मविआमध्ये जागा कोणत्या पक्षाला?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत स्नेहलता कोल्हे भाजपाकडून तर आशुतोष काळे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी आशुतोष काळे यांनी ८०० मतांनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला. मात्र यंदा आशुतोष काळे महायुतीत सामील झाल्याने युतीचे तिकीट मलाच असणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपच्या कोल्हेंची कोंडी झाल्याचं चित्र आहे.
कोपरगाव मतदारसंघातून कोल्हे परिवाराकडून स्वतः स्नेहलता कोल्हे की त्यांचे पुत्र विवेक कोल्हे कोण उमेदवारी करणार आणि कोणत्या पक्षाकडून करणार? याचीच चर्चा रंगत आहे. मात्र कोपरगावची जागा राष्ट्रवादीला असल्याने येथे शरद पवार गटाचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोपरगावची जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि कोण उमेदवार असणार? याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.