१९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी १९९९ ते २००९ पर्यंत सलग तीन टर्म आमदार राहिले. २०१४ साली मधुकरराव यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. मात्र मोदी लाटेत त्यांची दिशा भरकटली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपकडून अकोले विधानसभेची उमेदवारीही मिळवली. ऐनवेळी शरद पवार यांच्यासमोर नविन उमेदवार शोधण्याची वेळ आली. शरद पवार आणि अजित पवारांनी किरण लहामटे यांना अकोल्यातून उमेदवारी दिली आणि पूर्ण ताकद लावून लहामटे यांना निवडून आणले. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर किरण लहामटे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार सोबत गेले.
राज्यात महायुती अस्तित्वात आल्यानंतर अकोले मतदारसंघात दोन्ही दिग्गज पिचड आणि लहामटे महायुतीत आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोल्यात काय होणार? अशी चर्चा असतानाच शरद पवारांनी नवीन डाव टाकला असून स्वर्गीय अशोक भांगरे यांचे चिरंजीव अमित भांगरे आणि त्यांच्या मातोश्री सुनीता भांगरे यांना बळ द्यायचे ठरवले असून शुक्रवारी १९ जुलै रोजी अकोले येथे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचा ६१ वा जयंती सोहळा आणि भव्य शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहे. सध्या अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा असून उद्या शरद पवार अकोल्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिचड घेणार शरद पवारांची भेट?
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड सध्या भाजपत आहे. महायुतीत अकोले विधानसभेची जागा जर अजित दादा गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना सुटली तर वैभव पिचड यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत वैभव पिचड उद्या शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अकोले दौऱ्यात पिचड शरद पवारांची भेट घेणार का? याकडे नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.