अजितदादांशी का केली युती? मान, अपमान, तह, सलगी.. फडणवीसांनी सांगितली शिवरायांची नीती

पुणे: मुख्यमंत्री कोण होणार, कोणाचा होणार यावर चर्चा करत बसू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आणि भाजप पुन्हा एकदा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरणार ही खात्री बाळगा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजपच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राष्ट्रवादीसोबत युती का केली, याचं उत्तरदेखील फडणवीसांनी यावेळी दिलं.

भाजप घडण्यामागे आणि वाढण्यामागे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्याला काहीच मिळणार नाही असं मानून पक्षातला कार्यकर्ता काम करतो. तो व्यक्तीसाठी नव्हे, तर विचारांसाठी काम करतो, असं म्हणताना फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य साकारताना घेतलेल्या विविध निर्णयांचा दाखला दिला. शिवरायांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी कधी एक पाऊल पुढे टाकलं, तर कधी एक पाऊल मागे घेतलं. कधी मान, अपमान, कधी तह, तर कधी सलगी केली. त्यांनी हिंदवी स्वराजाच्या स्थापनेसाठी या सगळ्या गोष्टी केल्या, असं फडणवीस म्हणाले.
Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे पण सबमिटच करायचे नाहीत, हा महाविकास आघाडीचा डाव, फडणवीस यांचा गंभीर आरोप
आज आपणदेखील अनेक गोष्टी केल्या आहेत. वेगळ्या परिस्थितीत सरकार स्थापन केलं. वेगवेगळे मित्र जोडले. काहींना हे आवडलं असेल तर काहींना आवडलं नसेल. पण सत्ता मिळवणं इतकाच आपला उद्देश नव्हता. महाराष्ट्रात जेव्हा आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर अत्याचार सुरु होता, कोविडच्या काळात भ्रष्टाचार सुरु होता, तेव्हा आम्ही परिवर्तन घडवलं. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे, त्यांच्या विचारांचं प्रतिधिनीत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना आपण सोबत घेतलं, असं फडणवीसांनी सांगितलं.
Maharashtra BJP: यंदा ‘मी पुन्हा येईन’ नाही! भाजपची स्ट्रॅटर्जी ठरली; शिंदेंच्या CM पदाबद्दलही निर्णय झाला
आधी शिंदेंना सोबत घेतलं, मग मग दादांना साथीला घेतलं. आपण त्यांच्यासोबत अनेक वर्षे संघर्ष केला ही गोष्ट खरी आहे. ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याशी सलगी कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडला. पण ध्येय जेव्हा स्पष्ट असतं तेव्हा त्याकडे जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावी लागतात, तर कधी दोन पावलं मागे यावं लागतं. कधी सलगी, तर कधी तह करावा लागतो. मला सागर बंगला मिळाला किंवा तो मिळावा यासाठी हे सरकार आणलेलं नाही. तर पंतप्रधान मोदी ज्याप्रकारे देशाला पुढे नेत आहेत, त्या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला हवा म्हणून आम्ही परिवर्तन घडवलं, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी अजित पवारांसोबत केलेल्या युतीची पाठराखण केली.

तुमच्या मनातून किंतु परंतु काढून टाका. मला दररोज १०० मेसेज येतात. लोक अनेक सल्ले देतात. माणसांचे दोनच प्रकार असतात. एक काम करणारे आणि दुसरे सल्ले देणारे. काम करणाऱ्यांचे सल्ले ऐकून घेतो. पण काम न करता नुसते सल्ले देणाऱ्यांचं काय? सगळं नेत्यांनी करावं असं नाही आणि सगळंच कार्यकर्त्यांनी करावं असं नाही. काही चुका आमच्याही हातून झाल्या असतील, तर कार्यकर्त्यांनी त्या पोटात घ्याव्यात. कारण आम्हीही तुमच्यासारखेच कार्यकर्ते आहोत. पद मिळालं म्हणून आम्ही मोठे झालेलो नाही. पण नुसत्या चर्चा करायच्या, निगेटिव्ह बोलायचं हे योग्य नाही. अनेक जण पक्षासाठी निष्ठेनं काम करतात. त्यांच्या मनात विष कालवायचं काम कोणी करु नये. कारण अजूनही हा पक्ष निष्ठावंतांच्या जीवावर उभा आहे, असं फडणवीस भाषणाच्या शेवटी म्हणाले.