अजित पवारांना कार्यकर्त्यांकडून हटके शुभेच्छा; केकवरील मजकूर वाचून दादा गालातल्या गालात हसले

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या समर्थकांसह अनेकांची इच्छा आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमधील अजित दादांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा केक कापला. त्या केकवर असलेल्या मजकुरानं अनेकांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे केकवर असलेला मजकूर वाचून अजित पवार गालातल्या गालात हसले.

“मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..” असा मजकूर असलेला केक अजित पवारांच्या पाठिराख्यांनी आणला होता. अजित पवारांचा वाढदिवस उद्या आहे. पण उत्साही कार्यकर्ते अजित पवारांसाठी आजच केक घेऊन आले. पांढऱ्या रंगाच्या क्रिमवर मजकूर लिहिण्यात आलेला होता. केकवर डाव्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह होतं. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून अजित पवारांनी केक कापला. त्यांनी केकचा तुकडा खाल्ला. केकवर असलेला मजकूर वाचून अजित पवारांची कळी खुलली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. केक कापताना दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.

अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अजित दादांना केकच्या स्वरूपात हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची सध्या चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत १५ ते १६ माजी नगरसेवकदेखील दादांची साथ सोडून गेले. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं. विधानसभेआधी अजित पवारांना मोठा धक्का बसला.

काकांनी दादांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का दिलेला असताना त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेला निर्धार मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातच पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचा नवीन शहराध्यक्ष कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्या जाणकारांच्या गळ्यातच अध्यक्षपदाची माळ पडणार अशी चर्चादेखील सुरू आहे.