लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयामधील ही वाघनखे मायभूमीत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निकराचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे अनेक इतिहासकारांनी या वाघनखांबाबत प्रश्न उपस्थित करून ही वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीतच, असे दावे केले. त्यामुळे ही वाघनखे भारतात येणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली गेली. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नाने शिवप्रेमींची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून, ही वाघनखे साताऱ्यात पुढील काही महिन्यांसाठी आलेली आहेत. शनिवारपासून शिवप्रेमींना त्याचे दर्शनही घेता येणार आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या खात्याकडून गंभीर चूक
साताऱ्यातील आजच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्स माध्यमावर ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली. याच ध्वनीचित्रफितीत पाकव्याप्त काश्मिर हा भारतापासून वेगळा दाखवला गेला तसेच सियाचिन हा प्रदेश देखील रेखांकित दाखवून वेगळी ओळख दाखविण्याचा प्रयत्न झाला.
भारताच्या प्रादेशिक अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मानले जाते
भारताच्या चुकीच्या बाह्य सीमा आणि किनारपट्टीचे चित्रण करणारे नकाशे प्रकाशित करणे हे भारताच्या प्रादेशिक अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मानले जाते आणि त्यात जो कुणी दोषी आढळेल अशा व्यक्तिला किंवा संस्थेतील व्यक्तींना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे कायदा सांगतो.
पुढील तीन वर्षांसाठी वाघनखे भारतात
पुढील तीन वर्षांसाठी शिवरायांची वाघनखे भारतात दाखल झाली असून सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या चार शहरांत ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची घोषणा केली जाईल. मुख्यमंत्री याची घोषणा करतील, अशी माहिती गुरुवारी सुधीर मुनगंटीवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.