नेमके प्रकरण काय
मुंबई शहराची जिल्हा नियोजन समिती बैठकीत मुंबईतील सर्व आमदार प्रभागातील समस्या आणि विकासकामाची कागदपत्रे घेवून हजर झाले होते. अशातच मुंबई शहरात सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पडझडीचे प्रकार झाले आहेत. हीच बाब चांदिवली कुर्ला विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उचलून धरली. दिलीप लांडे म्हणाले “माझ्या परिसरात डोंगर कोसळला, लोकांच्या घरावर दगडी पडले पण एकही शासकीय अधिकारी माझ्या प्रभागातील स्थिती पाहण्यासाठी आले नाही” असा तक्रारीचा सूर दिलीप लांडे यांनी लावला.
आमदार दिलीप लांडे यांनी इतक्यावरच न थांबता थेट विकासकामांसाठी आणलेली कागदपत्रे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर फाडत जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार घातला. यानंतर आमदार दिलीप लांडे यांच्या मागोमाग आमदार नवाब मालिक सुद्धा बैठकीतून बाहेर पडल्याचे चित्र दिसले, दोघेही बराच वेळ बैठकीच्या बाहेर एकमेंकाशी संवाद सुद्धा साधताना दिसले.
संपूर्ण घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली. दिलीप लांडे म्हणाले “प्रशासनाला वेळ नाही त्याच्याकडे निधी नाही, साधे नामफलक लावायला सुद्धा निधी आमदारांना दिला जात नाही, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो, तो नाश्ता का दिला जातो, जनतेच्या विकासकामे करायची नाही. फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांची तोंड बंद करायची म्हणून अशा बैठकीवर बहिष्कार घातला” असे दिलीप लांडे म्हणाले.