शीव उड्डाणपूल आणि अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी असून उंचीरोधक (हाइट बॅरियर)बसवण्यात आले आहेत. मात्र आगमन-विसर्जनासाठी हे दोन्ही पूल सोयीचे असल्याने त्यांचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी समन्वय समितीने केली. त्याचप्रमाणे घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड पूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा रेल्वे पूल, मरिन लाइन्स रेल्वे पूल, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड येथील कॅनेडी पूल, महालक्ष्मी, प्रभादेवी, दादर टिळक पूल यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी समन्वय समितीने केली. यातील अनेक पुलांची वजन पेलण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पुलांची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल बंद झाल्याने पर्यायी मार्ग सुचवण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
राज्य सरकारने २०२३मध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, ज्या मंडळांना २५ वर्षे, ५० वर्षे व ७५ वर्षे झालेली आहेत, अशा मंडळांना दरवर्षी गणेशोत्सव मंडप परवान्याचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून परवानगी देण्याचे ठरले होते. याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रश्नी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीत या मुद्द्यांवरही चर्चा
– मुंबई महापालिकेकडून विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली जाते, त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी समितीने केली. त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले.
– प्रत्येक विभागातील पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती विक्री केंद्र गुगल मॅपवर दर्शवले जाईल, असे महापलिकेने स्पष्ट केले.
– ७ सप्टेंबरला गणेश प्रतिष्ठापना होत आहे. गणेश मंडळांना मंडप परवान्यासाठी एक महिना आधी अर्ज सादर करण्याची बाब समितीने महापालिकेच्या निदर्शनास आणली. त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापालिकेने दिल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.