दरम्यान याच कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्याकडून विश्वजीत कदम यांचा पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला, भावी मुख्यमंत्र्यांसह सांगलीचे पालकमंत्री असा देखील उल्लेख केला, यानंतर विशाल पाटलांच्या विधानावर याची बातमी करू नका नाहीतर सगळं जग राहिलं बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल असे म्हणत विश्वजीत कदम यांनी जिल्हास्तरीय राजकरणावर लक्ष वेधले.
सांगलीमध्ये शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ओळख करून देत असताना “आपल्या जिल्ह्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही. त्याला पंचांग वगैरे देखील बघावे लागत नाही” असे विधान केले आणि जमलेल्या साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.
तर याला उत्तर देताना विश्वजीत कदम यांनी देखील पाटलांच्या स्तुतीला उत्तर दिले, “बोलण्याच्या ओघांमध्ये खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला. परंतु याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग राहील बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागते” असे म्हणत विश्वजीत कदम यांनी राजकीय टोला लगावला.