दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार, राऊतांची मागणी

मुंबई : दीड हजार रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? लाडक्या भावांप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनाही दरमहा १० हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारकडे केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मात्र आमची भूमिका आहे, की खरी गरज लाडक्या बहिणींना आहे, ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत, एअर इंडियाच्या कार्यालयासमोर २००० लोडरच्या जागा भरण्यासाठी २५ हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही १० हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यातही १० हजार रुपये टाका, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

१५०० रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर १५०० रुपयात चालू शकेल का? लाडक्या बहिणीवर अन्याय कशाला? लाडक्या बहिणीलाही १० हजार द्या आणि लाडक्या भावालाही. स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात दाखवून द्या, एवढीच आमची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले.

८ लाख कोटी रुपयांचं कर्ज

महाराष्ट्रावर ८ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकारने नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण ही मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊही आणलंय. पण १० हजारात बहिणींचं घर चालेल, शेतकरी आत्महत्या थांबतील, असं राऊत म्हणाले.

विधानसभेला मविआ २८० जागा जिंकेल

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८० जागा जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. आम्ही फक्त २८८ जागांची चाचपणी करतोय. मविआतील तिन्ही पक्ष तसाच अभ्यास करत आहेत. मग एकत्र बसून कोणी कुठे कशा जागा लढायच्या हे ठरवू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

भुजबळ फिरत्या रंगमंचाचे कलाकार

छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटातही काम केलंय. अनेकदा आपलं रंग रुप बदलून नाट्य निर्माण करण्यात ते माहीर आहेत. ते शरद पवारांच्या भेटीला का गेले, कसे गेले, त्यामुळे राजकारणात कशी खळबळ उडाली, हे सर्वांनी पाहिलं. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना महाराष्ट्रासह देशभरात प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात हा फिरता रंगमंच आहे. भुजबळ हे त्यावरील कलाकार, असं राऊत म्हणाले.