दादांचा विकासाचा दावा पण निवडणूक तुम्ही जिंकली, शरद पवारांच्या उत्तराने हशा पिकला

पुणे : देशातील प्रतिष्ठित लढतींपैकी एक मानली जाणारी बारामती लोकसभेची लढत सुप्रिया सुळे यांनी जिंकून सुनेत्रा पवार यांना पराजयाचे पाणी पाजले. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी लढत झालेली असली तरी खरी लढत काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार यांच्यातच मानली जात होती. अजितदादांचा विकासाचा वादा विरुद्ध शरद पवार यांना पक्षफुटीमुळे मिळत असलेली सहानुभूती अशा प्रमुख मुद्द्यांवर झालेल्या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुप्रिया सुळे यांना साथ दिल्याने अजित पवार यांचे बारामतीतच पानिपत झाले. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना पुण्यातील पत्रकारांनी अनेकानेक संदर्भांनी प्रश्न विचारून बोलते करण्याचा प्रयत्न केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित ‘वार्तालाप कार्यक्रमा’त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास आणि अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे दिली. लोकसभेतील देदिप्यमान यश, पक्षफुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणावर झालेले परिणाम, राज्यातली सामाजिक अस्थिरता, आरक्षणविषयक प्रश्नांनी जनमानसांत असलेली अस्वस्थता, नुकतीच पार पडलेली विधान परिषद निवडणूक अशा प्रश्नांना पवार यांनी उत्तरे दिली.
बारामतीतून ५ वाजता फोन गेला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली, छगन भुजबळांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

दादांचा बारामतीत विकास पण मतदारांची तुम्हाला साथ, का बरं?

अजित पवार यांचे बारामतीतील विकासाचे मॉडेल राज्यात चर्चेचा विषय आहे. पण असे असतानाही बारामती लोकसभेच्या मतदारांनी त्यांना नाकारून सुप्रिया सुळे पर्यायाने तुमच्या नेतृत्वावर का विश्वास ठेवला असावा? असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला असता ते म्हणाले, अरे ती बारामती आहे बाबा…. पवार यांच्या नेमक्या उत्तराने एकच हशा पिकला. त्यांना स्वत:लाही हसू आवरता आले नाही.
गेला काय राहिला काय आम्हाला देणंघेणं नाही, भुजबळ-पवार भेटीवर जरांगे यांची जळजळीत प्रतिक्रिया

लोकशाही प्रक्रियेत संवाद सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. गेल्या दोन पिढ्यांशी माझा उत्तम संवाद होता. मतदारसंघातील अनेक लोकांना मी नावानिशी ओळखत होतो. त्यातील अनेक माणस आता हयात नाहीत. परंतु माझा बऱ्याच लोकांशी संवाद होतो. मला खात्री होती की लोक सुप्रिया सुळे यांनाच मतदान करतील, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेणार का?

अजित पवार यांना कुटुंबात स्थान असेल पण पक्षात असेल का याचे उत्तर मी सध्या देऊ शकत नाही. कारण अडचणीच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी मला साथ दिली. माझे सगळे सहकारी ज्यांनी संघर्षाच्या काळामध्ये पक्षाला मजबुतीने उभे केले, त्यांना विचारात घेऊन त्यांच्या सहमतीनेच निर्णय होईल, असे पवार म्हणाले.