आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटनही केलं. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाकाठी १८ हजार रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकांनी आमच्यावर टीका केली की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, पण लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे.आम्ही त्यांच्यासाठीही एक योजना आणत आहोत. जे तरुण बारावी पास झाले आहेत, त्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला १० हजार रुपये दिले जातील.
हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.