मोदीजी, पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा
नरेंद्र मोदींनी राजकारणाची चेष्टा करून ठेवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर उलट सुलट बोलत आहेत. पंतप्रधानांमध्ये थोडीतरी मर्यादा असायला हवी. पंतप्रधानांनी देशासमोरील गोष्टींची, प्रश्नांची जाण ठेवून भाषणे करायला हवी. परंतु देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर न बोलता ते ज्येष्ठ नेत्यांचा भाषणांमधून अपमान करत आहेत. शरद पवारांवर टीका करून तुम्हाला काय फायदा आहे? अशी टीका करून तुम्हाला काय मिळणार आहे? पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा, असे राहुल गांधी यांनी सुनावले.
मराठा-धनगरांना आरक्षण देणार
इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार, ज्यामुळे मागास वर्गाला आरक्षण देण्याचा पर्याय खुला होईल. जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
पेपरफुटीतील आरोपींविरोधात आम्ही कडक कायदा आणणार
तसेच युवकांना पेपरफुटीचा त्रास होई नये म्हणून आम्ही खासगी यंत्रणांना परीक्षा घेण्याची कंत्राटे न देता सरकारी यंत्रणांद्वारेच परीक्षा घेऊ, असे सांगतानाच पेपरफुटीतील आरोपींविरोधात आम्ही कडक कायदा आणणार आहोत, असे वचन राहुल गांधी यांनी दिले.
निवडणूक रोख्यांवरून मोदी लक्ष्य
तसेच निवडणूक रोख्यांवरूनही राहुल यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. देशात कोरोनाचे थैमान सुरू होते. व्हेंटिलेटर ऑक्सिजनची कमतरता होती, त्यावेळी सत्ताधारी भाजप आणि मोदी तुम्हाला थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगत होते. कोरोनाची लस बनविणाऱ्या कंपनीने भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे दिले, हे जनतेसमोर आले आहे? एकीकडे कंपन्यांना कंत्राटे द्यायची आणि त्यानंतर काहीच दिवसांत परतफेड म्हणून संबंधित कंपन्यांनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी द्यायचा, अशी ‘क्रोनोलॉजी’ राहुल यांनी लोकांसमोर मांडली.
काँग्रेसची गॅरंटी
महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये, तरुणांना वर्षाला एक लाख देणारी नोकरी, ३० लाख रिक्त जागांसाठी भरती आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत रकमेसाठी कायदा ही काँग्रेसची गॅरंटी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी आवर्जून केला.