संस्थेच्या एका नामवंत महाविद्यालयात संबंधित प्राध्यापिका कार्यरत होत्या. त्यांच्या तक्रारीनुसार, ‘तेथील सहकारी प्राध्यापकाकडून कामाच्या ठिकाणी सातत्याने निमित्त काढून त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न होत होता. त्याचप्रमाणे द्वैअर्थी टोमणे मारले जात होते. हे टोमणे प्राध्यापकाच्या पेशाला न शोभणारे आणि अत्यंत खालच्य़ा पातळीतील होते, तर दुसरा प्राध्यापक हा संबंधित महिला प्राध्यापकाच्या खासगी आयुष्याची माहिती काढून मानसिक त्रास देत होता.’
हा प्रकार जुलै २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराबाबत महिलेने प्राध्यापकांच्या विरोधात तत्कालीन महाविद्यालय विकास समितीच्या (सीडीसी) अध्यक्षांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. मात्र, संबंधित प्राध्यापक सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याने, त्यांना वाचविण्यासाठी विश्वस्त आणि सदस्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे तक्रारदाराच्या मागणीकडे सुरुवातीला सपशेल दुर्लक्षित करून तक्रार मागे घेण्याचा दबाब टाकण्यात येत होता. मात्र, पीडित महिलेने तक्रारींचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, अखेर सोसायटीला ‘आयसीसी’ची स्थापना करावी लागल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
घटक संस्थेतील दोन व्यक्तींमध्ये गैरसमजातून वाद निर्माण झाला. संस्थेने मध्यस्थी करून वाद सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु तसे होत नाही हे लक्षात आल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रिया केली असून, निर्णय घेतले आहेत.
प्रमोद रावत, अध्यक्ष, नियामक मंडळ आणि परिषद, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
या समितीच्या बैठकांमध्ये पीडित महिला आणि संबंधित प्राध्यापकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, समितीने २५ पैकी २४ तक्रारींमध्ये संबंधित प्राध्यापकांना दोषी ठरवले. मात्र, त्यानंतरही संबंधित प्राध्यापकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी पीडित महिलेने न्यायासाठी मार्च महिन्यात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरही कार्यवाही झाली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून न्याय मिळेल या आशेने महिलेने विद्यापीठ आणि महाविद्यालयीन न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. त्यावर जुलै महिन्याच्या शेवटी सुनावणी होणे अपेक्षित असल्याचे महिलेने सांगितले.