तिथे आमचा दावा
याविषयी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना, अजित पवार म्हणाले की, “प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे सर्व्हे करतील, तिघांचे सर्व्हे समोर ठेवले जातील, त्याच्यात जे दोन सर्व्हे एका बाजूला जातील, तिथे आमचा दावा” असं दादा म्हणताच बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह उपस्थितांमध्ये हशा पिकला.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश लाभले नाही. रायगडची एक जागा सोडली, तर इतरत्र पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. हे अपयश मागे सारत, राष्ट्रवादी पक्ष जोमाने कामाला लागला असून रविवारी बारामती येथे जनसन्मान रॅली आयोजित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
सर्व जागांचे सर्वेक्षण
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातर्फे राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून कुठल्याही जागी आपल्या पक्षाला अनुकूलता आहे, हे तपासण्यात येणार आहे. पक्षातर्फे नेमक्या किती जागा लढविण्यात येणार हे महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीतच ठरेल, परंतु पक्षातर्फे सर्व जागांची चाचपणी करण्यात येणार आहे. उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता या सर्वेक्षणात तपासून पाहण्यात येईल. भाजप, शिवसेना यांनीही सर्वेक्षण केल्यास ज्या जागेवर बहुमत असेल त्यांना ती जागा मिळेल, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘मुस्लिम नेत्यांना संधी देणार’
राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्यांची यादी लवकरच अंतिम करण्यात येणार असून त्यात मुस्लिम नेतृत्वालाच संधी देण्यात येणार आहे. सध्या पाहिले तर विधान परिषदेत एकही मुस्लिम नेता नाही, असे कधीच झाले नव्हते. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत पक्षातर्फे एका मुस्लिम नेत्याला प्रतिनिधित्व देण्याची संधी देण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवण्यात येतील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
‘ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या’
अनेक जण म्हणत होते, लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातून आमदार जातील, मग म्हणाले की, निधी मिळाल्यावर जातील, त्यानंतर दावा करण्यात आला की, विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर पक्ष फुटेल, पण असे काहीही झालेले नाही. ज्यांना जायचे त्यांनी जावे, मी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देईन, असा कडक पवित्रा पवार यांनी घेतला.