राज्यात निर्माण झालेली जातीय दुफळी मिटवण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं भुजबळांनी सांगितलं. पत्रकार परिषद घेत त्यांनी भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील दिला. ‘राज्यात ओबीसांना आरक्षण देण्याचं काम तुम्ही मुख्यमंत्रिपदावर असताना झालं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती आहे. मराठा समाजाचे लोक ओबीसींच्या हॉटेलात, दुकानात जात नाहीत. ओबीसी मराठ्यांच्या हॉटेलांकडे, दुकानांकडे पाठ फिरवतात, इथपर्यंत परिस्थिती गेली आहे. राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून शांतता निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी विनंती मी शरद पवारांकडे केली,’ असं भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना काय आश्वासनं दिली, त्यांना काय सांगितलं, याची मला कल्पना नाही, असं पवार म्हणाले. त्यावर हाकेंना आम्ही उपोषण सोडण्यास सांगितलं. तुमच्या उपोषणामुळे वातावरण आणखी तापेल असं आम्ही त्यांना सांगितलं. पण मनोज जरांगेंना काय सांगण्यात आलं ते तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना विचारा, असं मी पवारांना सांगितलं, असा तपशील भुजबळांनी दिला.
राज्यातील परिस्थितीची तुम्हाला चांगली जाण आहे. सामाजिक घटकांचा तुम्हाला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन केलंत तर सगळे ऐकतील. तंग वातावरण शांत व्हावं हाच माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी कोणाशीही बोलायला तयार आहे. त्यात मला कोणताच कमीपणा वाटणार नाही. शरद पवार ज्येष्ठ आहेत. ते बोलले ते सगळे ऐकतील. त्यांना राज्याच्या समाजमनाची चांगली जाण आहे. त्यामुळे पवारांनी पुढाकार घेतला तर मुख्यमंत्रीही ऐकतील. मुख्यमंत्री झाले म्हणजे सगळ्याचा अभ्यास असतोच असं नाही, असं म्हणत भुजबळांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. भेटीसाठी त्यांनी शरद पवारांकडून कोणतीही वेळ घेतलेली नव्हती. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. भुजबळ अचानक सिल्व्हर ओकवर पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांच्या भेटीबद्दल दोन्ही गटातील नेते अनभिज्ञ होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही भेटीची कल्पना नव्हती.
शरद पवारांनी आज भेटीसाठी केवळ दोघांना वेळ दिली होती. त्यातील एक भेट ठाकरेसेनेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याशी झाली. ते भेटून गेल्यानंतर छगन भुजबळ अचानक पोहोचले. शरद पवारांनी त्यांना जवळपास दीड तास भेट दिली नाही. त्यामुळे भुजबळ ताटकळत बसले. अखेर त्यांची पवारांसोबत भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली.