Today Top 10 Headlines in Marathi: अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट, तर पुजा खेडकरांचे पाय खोलात; सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. आजी-माजी मंत्र्यांमध्ये निधी वाटपावरुन शाब्दिक चकमक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठक सुरू असताना आज आजी-माजी आदिवासी विकास मंत्र्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद वाढला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निधी वाटपावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी विकास विभागाने दिलेल्या वाढीव निधीबाबत परिपत्रक काढल्यावरुन सदरचा वाद निर्माण झाला होता. पालकमंत्र्यांनी परिस्थिती सावरुन घेण्याचा प्रयत्न केल्याचे बैठकीत दिसून आले. अधिक बातमी वाचा सविस्तर…

२. अजित पवारांनी घेतली अमित शहांची दिल्लीत भेट

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अचानक दिल्लीला गेले व त्यांनी भाजप नेते, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यामध्ये पवार यांनी प्रस्तावित राज्य मंत्रिमंडळ विस्तार, तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत आपले मत शहा यांच्यासमोर मांडल्याचे समजते. पवार यांनी युतीतील एका ‘संवेदनशील’ विषयाबाबतही त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते, मात्र त्याचा तपशील समोर आलेला नाही.

३. मोदी सरकारवर केसी वेणुगोपाल यांचा आरोप

मोदी सरकार माझा फोन हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी केला. खासगीपणाच्या अधिकारावर आक्रमण करणाऱ्या सरकारच्या या घटनाबाह्य कृतीला कडाडून विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४. पुजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन उघड

आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या वर्तणुकीवरून ती आणि तिचे कुटुंबीय आता चांगलेच वादात अडकले आहेत. तोच तिचे वडील दिलीप खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे सुमारे १४ गुंठे जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील सातबाराही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुळशीपाठोपाठ वाघळवाडीतही जमीन असल्याचे समोर आले आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

५. कागदावर हजेरी, कामावर दांडी!

कामकाजावेळी हजेरी मस्टरवर ३८ स्वच्छता कर्मचारी उपस्थित असल्याचे दर्शविण्यात येऊन प्रत्यक्षात कामावर चारच कर्मचारी हजर होते. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी शनिवारी (दि. १३) दुपारी स्वच्छता विभागाच्या सोनापुरा स्वच्छता हजेरी सेंटरवर अचानक केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या पाहणी दरम्यान हजेरी मस्टरवर एकूण ३८ स्वच्छता कर्मचारी हजर असल्याचे नमूद करण्यात आले असताना प्रत्यक्षात केवळ चार स्वच्छता कर्मचारी हजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत.

६. पोलीस ठाण्यातून संशयित आरोपी फरार

नंदुरबार येथील शहर पोलीस ठाण्यात काल १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान एका गुन्ह्यात चौकशीसाठी एका संशयित आरोपीला आणले. पोलीस ठाण्यातून संशयिताने अचानक पळ काढला. या संशयितामागे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतलं. याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संशयिताला पकडण्यास पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसले.

७. भीषण अपघातात थोरल्या भावाचं निधन

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बाबळे फाट्याजवळ अज्ञात अवजड वाहनाने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका ४२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा युवक जखमी झाला आहे. चेतनकुमार शिवाजी पाटील (रा. पित्रेश्वर, ता. शिरपूर, जि.धुळे) असं मयत युवकाचं नाव आहे. घटनास्थळावरून माजी खासदार डॉ. सुभाष भामरे जात असताना त्यांनी जखमींची विचारपूस करत मयताची तपासणी केली.

८. अफगाणच्या कांद्याची टांगती तलवार

कांदा निर्यातीचे घोंगडे अद्याप भिजत असताना आणि नाफेड-एनसीसीएफच्या कारभाराची चौकशी सुरू असताना अफगाणिस्तानच्या कांद्याची नवी टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना सद्यस्थितीत जी धास्ती वाटते आहे, तो अफगाणिस्तानमधून २०० टन कांदा दिल्ली आणि अमृतसर येथे विक्रीसाठी आला आहे. तेथिल्या बाजारात अफगाणचा कांदा ३० रुपये किलोने विक्री होत आहे. तर भारतात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलो आहेत. आयातीच्या कांद्याचा भारतीय कांद्यावर विशेष परिणाम होणार नसल्याचा उत्पादकांचा अंदाज आहे. मात्र, तरीही कांद्याचे दर ढासळू नये यासाठी कांद्याच्या कुठल्याही प्रकारच्या आयातीस शेतकरी वर्गातून विरोध होताना दिसतो आहे.

९. घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम

सध्या सर्वत्र एकच चर्चेचा विषय आहे तो म्हणजे अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न. पण या लग्नात बच्चन कुटुंबाकडे सर्वांच्या नजरा होत्या कारण सहकुटुंब सहपरिवार लग्नाला गेलेल्या या कुटुंबात ऐश्वर्या आणि आराध्या मात्र नव्हते. त्या दोघी वेगळ्या आलेल्या त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगवेगळे लोक तर त्यांचा घटस्फोट झालाय असा समज करुन बसलेले. पण या सगळ्याला पूर्णविराम देणारा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे हे कपल एकत्र दिसत आहे. आराध्या तिच्या वडिलांच्या शेजारी बसलेली दिसते.

१०. रश्मिकाची किलर अदांमध्ये अंबानीच्या सोहळ्याला एंट्री

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंतचे शुक्रवारी 12 जुलै 2024 रोजी लग्न झाले. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचे अनेक स्टार्सही त्यांच्या सुंदर लुकमध्ये पोहचले. आज अनंत राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला देखील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. पण यामध्ये एका व्यक्तीने सर्वात जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे साऊथची नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने..! अधिक बातमी वाचा सविस्तर…