नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून अराजकता आणण्याचे काम केले जात आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केली. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मतांसाठी मोठा घोडेबाजार केल्याची टीकाही राऊत यांनी केली. राऊत यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी हे अनुशासन पर्व होते. त्या काळी काही कठोर पावले उचलले आवश्यक होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आणीबाणीला पाठिंबा दिला होता, असे राऊत म्हणाले. इंदिरा गांधींनंतर सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या एकाही सरकारला आणीबाणी लागू झालेला दिवस हा लोकशाहीची हत्या दिन म्हणून साजरा करावा, असे वाटले नाही. मात्र, मोदी सरकारला काही काम उरलेले नसल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे उद्योग चालवले आहेत, असेही राऊत म्हणाले.
विधानपरिषदेची निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी झाली. प्रचंड घोडेबाजार करून आमदारांना कोट्यवधी रुपये आणि काहींना जमिनही देऊन मते विकत घेतली गेली. शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मते फुटली नाहीत. काँग्रेसची सात मते फुटली. फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये असलेले ते सात कोण आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्यामुळेच चंद्रकांत हांडोरेंचाही पराभव झाला होता, असे राऊत म्हणाले.
गद्दारांची निवडणूक
शिंदे गट आणि अजित पवार गटाला विजयाचा कसला एवढा उन्माद आहे? भाजपचे १०३ आमदार होते आणि त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले. दोन गद्दार गटांनी आपल्या दोन- दोन गद्दारांना निवडून आणले. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी झालेली ही निवडणूक होती. यात महाविकास आघाडीला काय फटका बसला? काँग्रेसने काँग्रेसचा, तर शिवसेनेकडे कोटा नसतानाही काँग्रेसच्या मदतीने आपला उमेदवार निवडून आणला, असे संजय राऊत म्हणाले.