मुंबई सागरी किनारा मार्ग हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. १०.५८ किमीचा हा मार्ग आहे. यातील वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरिन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी हा पहिला टप्पा ११ मार्च २०२४रोजी आणि मरिन ड्राइव्ह ते हाजी अली मार्ग लोटस जंक्शनपर्यंत हा टप्पा १० जून २०२४रोजी वाहनांसाठी सुरू झाला. तर हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडे तीन किमीचा मार्ग ११ जुलैला सुरू झाला. सागरी किनारा मार्गावरून सर्व प्रकारची वाहने प्रवास करत असताना, बेस्ट बस मात्र चालवण्यात येत नव्हती. या मार्गावरून दहा ते पंधरा मिनिटांत प्रवास होतो. आता बेस्टची बस या मार्गावरून सुरू झाली आहे.
अशी असेल बससेवा
– एनसीपीए (नरिमन पॉइंट) ते भायखळा स्थानक पश्चिम आणि भायखळा स्थानक पश्चिम ते एनसीपीए व्हाया मुंबई सागरी किनारा मार्ग असा मार्ग
– एनसीपीए येथून पहिली बस स. ८.५० वा., शेवटची बस रात्री ९ वा.
– भायखळा स्थानक पश्चिम येथून पहिली बस स. ८ वाजता, शेवटची बस रात्री ८.५० वा.
– किमान प्रवास भाडे ६ रुपये आणि कमाल भाडे १९ रुपये
– असा असेल मार्ग
एनसीपीए, हॉटेल ट्रायडंट, नेताजी सुभाष मार्ग, मरिन ड्राइव्ह, मुंबई सागरी किनारा मार्गे, पारसी जनरल रुग्णालय जंक्शन, हाजी अलीतील वत्सलाबाई देसाई चौक, महालक्ष्मी रेसकॉर्स, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, सात रस्ता, भायखळा स्थानक पश्चिम